शिक्षिकेच्या भेटीने चिमुकल्यांना अश्रू अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:00 PM2018-07-26T22:00:48+5:302018-07-26T22:01:24+5:30
तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले. तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार्यरत होत्या.
प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेची नुकतीच बदली झाली. बदली झाल्यानंतर ही शिक्षिका भेटण्यासाठी आली असताना विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर झाले.
तालुक्यातील महागाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत हिरा धुर्वे या शिक्षिका कार्यरत होत्या. गेली पाच वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिले. आता उपक्रमशील शिक्षिका हिरा धुर्वे यांची आर्णी पंचायत समितीमधील कुऱ्हा येथे बदली झाली आहे. त्या नवीन गावी रूजू झाल्या. मात्र विद्यार्थ्यांच्या ओढीने त्या महागावला त्यांच्या भेटीसाठी आल्या. त्या शाळेत येताच चिमुकल्यांना अश्रू अनावर झाले. चिमुकल्यांचे हे प्रेम बघून हिरातार्इंनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्यातील हा भावपूर्ण प्रसंग डोळ्यात साठवताना उपस्थित शिक्षक, पालकांनाही गहीवरून आले. सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. क्वचितच शिक्षक, शिक्षिका विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहतात. त्यापैकीच एक हिरा धुर्वे ठरल्या. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले. म्हणूत त्या विद्यार्थीप्रिय ठरल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
याप्रसंगी मुख्याध्यापक दत्तात्रय गावंडे, विषय शिक्षक गिरीश साबळे, अमिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका सूर्यकांता नरवाडे, सारिका माळवे यांनीही भावना व्यक्त केल्या.
विद्यार्थी, पालकांना जिंकले
हिरा धुर्वे यांनी शिक्षकी पेशा ही केवळ सरकारी नोकरी नसून एक व्रत असल्याचे मानले. त्यांनी आपल्या कार्याने विद्यार्थी व पालकांच्या मनात स्थान निर्माण केले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून महागाव येथे उल्लेखनीय कार्य केले. आता कुऱ्हा येथे बदली झाली, तरीही महागावच्या चिमुकल्यांच्या ओढीने त्या त्यांना भेटायला आल्या. शिक्षकांनी वटवृक्ष देऊन त्यांचे स्वागत केले. त्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.