तहसीलदारांच्या कारने दुचाकीला चिरडले, दोघांचा मृत्यू
By सुरेंद्र राऊत | Published: May 5, 2024 03:51 PM2024-05-05T15:51:32+5:302024-05-05T15:52:09+5:30
रात्री दीड वाजताची घटना : बोरी-दारव्हा मार्गावर झाला अपघात
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील दोन तरुण दुचाकीने बोरी येथून मोबाईल टॉवर दुरूस्तीचे काम आटोपून गावी परत जात असताना तहसीलदारांच्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला चिरडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दीड वाजता घडली. एकाचवेळी दाेन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अंकुश देवराव भजणे (२५, रा. रामगाव रामेश्वर), श्रीकांत प्रमोद ठाकरे (२४, रा. तोरनाळा) असे मृतांची नावे आहेत. हे दोघेही मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरूस्तीचे काम करत होते. शनिवारी बोरी येथे आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर दोघेही दुचाकी क्रमांक (एमएच २९, एबी ३७०८)ने जात असताना यवतमाळकडून दारव्हा जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच २९, बीव्ही ४१३७)ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
भरधाव कारने दुचाकीला काही फुटांपर्यंत फरफटत नेले. यात अंकुश देवराव भजणे याचा जागीच मृत्यू झाला तर श्रीकांत ठाकरे हा अत्यवस्थ हाेता. त्याला तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट दिली.
अपघाताला कारणीभूत असलेली कार ही तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीचे असल्याचे प्राथमिक पोलिस तपासातून पुढे आले आहे. कार कोण चालवत होते? याचा शोध घेतला जात आहे. तूर्त या प्रकरणी पोलिसांनी कारच्या अज्ञात चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.