तेली, लिंगायत, मराठा समाज मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:21 PM2018-01-07T22:21:58+5:302018-01-07T22:22:18+5:30
शहरात रविवारचा दिवस मेळाव्यांचा ठरला. एकाच दिवशी तेली, लिंगायत आणि मराठा समाजाचा मेळावा पार पडला. धकाधकीच्या युगात योग्य उपवर-वधू शोधणे अवघड झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात रविवारचा दिवस मेळाव्यांचा ठरला. एकाच दिवशी तेली, लिंगायत आणि मराठा समाजाचा मेळावा पार पडला.
धकाधकीच्या युगात योग्य उपवर-वधू शोधणे अवघड झाले. यावर मात करण्यासाठी रविवारी तेली समाज विवाह आणि सांस्कृतिक मंडळ, वीर शैव हितसंवर्धक मंडळ आणि मराठा समाजाच्यावतीने उपवर- वधू परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला राज्यातील समाजबांधव उपस्थित होते.
तेली समाज विवाह व सांस्कृतिक मंडळाचा मेळावा संताजी मंदिरात पार पडला. मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात खासदार रामदास तडस यांनी उपवर-वधू परिचय मेळावे काळाची गरज असल्याचे सांगितले. काळानुरूप बदल समाजाने स्विकारावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मांन्यवरांनी मनोगत व्यक्त केले. राज्यभरातून १२० उपवर-वधूंनी परिचय दिला. मंडळाचे अध्यक्ष महेश ढोले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन आंबाडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, संजय आसोले, डॉ. दीपक शिरभाते, प्रमोद ढांगे, नारायण कपले, गणेश शिरभाते, जितंद्र हिंगासपुरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्या चिंचोरे यांनी संचालन केले.
वीर शैव हा कष्टकरी समाज
लिंगायत समाजाला अल्पसंख्य दर्जा मिळावा म्हणून लढाई सुरू झाली आहे. वीर शैव समाज प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. यामुळे इंग्लडच्या पार्लमेंट परिसरात भगवान बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यात आला. लोकशाहीची स्थापना त्यांनी १२ व्या शतकात केली होती. त्याचाच हा गौरव आहे. मात्र देशवासीयांना त्यांची किंमत समजली नसल्याची खंत अॅड. अविनाश भोसीकर यांनी व्यक्त केली.
ते येथील महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित वीर शैव लिंगायत समाज आंतरराज्यीय उपवर-वधू परिचय मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मनोहरराव कापसे होते. वीर शैव हित संवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक मेनकुदळे, वीर शैव सभा पुणेचे उपाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता गाढवे, लिंगायत समाज कारंजाचे अध्यक्ष बाळासाहेब नंदे उपस्थित होते. यावेळी राज्यातील उपवर-वधूंनी परिचय दिला.
मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष
सध्याचे सरकार मराठा आरक्षणाकडे डोळेझाक करीत आहे. या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी नियुक्त वकील कमकुवत आहे. अभ्यास गटाची गतीही मंदावली आहे. या गतीने काम केले तर पुढील पाच वर्षे निकाल लागणार नाही. त्यासाठी मूक मोर्चा नव्हे, तर कानाखाली वाजवणारा मोर्चा हवा, असे प्रतिपादन उत्तमराव शेळके यांनी केले. मराठा समाजातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, माजी मंत्री संजय देशमुख, बाबासाहेब गाडे पाटील, सूर्यकांत गाडे पाटील, रवींद्र अरगडे, संजय काकडे, मनीषा जाधव, मंडळाचे अध्यक्ष अनिल वाघचोर, राहुल पवार, राम गायकवाड, उल्हास रणनवरे, बाळासाहेब मोहिते आदी उपस्थित होते.
समाज जागृतीसाठी मेळावे काळाची गरज - मुधोजी राजे
समाज जागृतीसाठी मेळावे काळाची गरज असून वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन असे कार्यक्रम वरचे वर घ्यावे, असे मत मुधोजी राजे भोसले यांनी व्यक्त केले. मराठा समाजातर्फे बलवंत मंगल कार्यालयात आयोजित उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते बोलत होते. यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या परिचय मेळाव्यात २०० च्या वर उपवर-वधूंनी परिचय दिला. युवा मराठा बहुउद्देशीय संस्थेने या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.