सांगा,काँग्रेस आमदार निवडून येणार कसे ?
By admin | Published: June 14, 2014 11:50 PM2014-06-14T23:50:55+5:302014-06-14T23:50:55+5:30
काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते अद्यापही सतरंजी उचलण्यापुरतेच मर्यादित आहेत, आमदारांच्या अवती-भोवती दलाल-कंत्राटदारांचा वावर कायम आहे, शासकीय यंत्रणेकडून क्षुल्लक कामासाठी सामान्य
कार्यकर्ते सतरंजीवरच : दलाल-कंत्राटदार अॅन्टी चेंबरमध्ये
यवतमाळ : काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते अद्यापही सतरंजी उचलण्यापुरतेच मर्यादित आहेत, आमदारांच्या अवती-भोवती दलाल-कंत्राटदारांचा वावर कायम आहे, शासकीय यंत्रणेकडून क्षुल्लक कामासाठी सामान्य नागरिकांची आर्थिक लूटमार सुरूच आहे, रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, वीज भारनियमन या जनतेच्या मूलभूत समस्याही गेल्या पाच वर्षात सुटू शकल्या नाहीत. ही सर्व विपरित परिस्थिती असताना जिल्ह्यात काँग्रेसचे आमदार पुन्हा निवडून येणार कसे, हा सामान्य मतदारांचा प्रश्न आहे.
आर्णीचे शिवाजीराव मोघे, राळेगावचे वसंत पुरके, वणीचे वामनराव कासावार, उमरखेडचे विजय खडसे, यवतमाळच्या नंदिनी पारवेकर हे काँग्रेसचे आमदार पुन्हा २०१४ ची विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत आहे. दिग्रस-दारव्हा या मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पूत्र राहुल ठाकरे नशीब आजमावणार आहेत. परंतु निवडणुकीला सामोरे जाताना या सर्वच नेत्यांच्या मनात हुरहूर आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांच्या पिछाडीने ही भीती आणखी वाढविली आहे. गेल्या पाच वर्षात आपण जनतेची काय कामे केली, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.
विधानसभेची २००९ ची निवडणूक ते २०१४ या पाच वर्षाच्या काँग्रेस आमदारांच्या कार्यकाळावर नजर टाकल्यास एकूणच जैसे थे स्थिती पहायला मिळते. सर्वाधिक वाईट अवस्था ही काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची आहे. गावागावातील तंटामुक्त समित्या, विशेष कार्यकारी अधिकारी ही क्षुल्लक पदेही कार्यकर्त्यांच्या पदरी पडली नाहीत. या उलट स्थिती काँग्रेसच्या नेत्यांची आहे.