सांगा, पाणीटंचाईवर काय उपाययोजना केल्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:28 PM2018-04-05T21:28:38+5:302018-04-05T21:28:38+5:30
शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई आलेली असताना जिल्हाभरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यवतमाळवर ‘फोकस’ ठेवताना जिल्ह्याच्या टंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नजर आहे. म्हणूनच शुक्रवारी सोळाही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांनी पाणीटंचाईवर नेमकी काय पावले उचलली, याचा आढावा घेतला जाणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षात नगरपरिषदांनी पूर्ण केलेल्या कामांबाबत जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. इतर कामांसोबतच पाणीटंचाईचा प्रश्न बैठकीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी स्वत:च उपस्थित राहिले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. यवतमाळप्रमाणेच बहुतांश नगरपरिषदांमधील पाणीपुरवठ्याची भिस्त शहरालगतच्या धरणांवर आहे. पांढरकवड्याची तहान सायखेडा धरणावर, घाटंजीचा पाणीपुरवठा आता येळाबारा धरणावर भागवायचा का, अशा हालचाली सुरू आहेत. परंतु, नेमके उपाय काय करता येतील, याबाबत बैठकीत खल होणार आहे.
शिवाय, नुकतेच आर्थिक वर्ष संपले आहे. गेल्या वर्षात कोणती कामे झाले, त्यावरील निधीचा विनियोग मुख्याधिकाऱ्यांनी कसा केला, याबाबतचाही आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यासाठी २०१३-१४ ते २०१६-१७ या वर्षांत नगरपरिषदांनी ज्या-ज्या कामांसाठी प्रशासकीय मान्यता घेतली होती, त्या कामांची संपूर्ण माहिती मागविण्यात आली आहे.
यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख नजर ठेऊन आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झालेल्या उपाययोजना आणि आगामी काळात होणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत ते माहिती घेणार आहेत. शहरात टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असून बैठकीत त्यावर खल होणार आहे. ही बैठक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
यवतमाळ शहरातील टंचाई उपाययोजनेबाबत उत्सुकता
सर्व मुख्याधिकाऱ्यांकडून पाणीटंचाईचा आढावा घेताना यवतमाळच्या प्रश्नावर प्रचंड खल होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकट, त्यात नगरपरिषदेतील दोन पक्षांचा संघर्ष यात टंचाईनिवारणाच्या कामांचा आढावा सादर करताना मुख्याधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. शिवाय, ३१ मार्चअखेर मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुली किती झाली, हेही सांगावे लागणार आहे. यवतमाळात मालमत्ता करावरून वादंग माजलेले आहे. अन् पाणीच नाही तर पाणीपट्टी वसुली किती झाली असावी, हाही प्रश्न आहे. एकंदरीत शहरातील पाणी प्रश्न गुंतागुंतीचा होत आहे.