सांगा, एसटी बसस्थानकात पार्किंगची सोय आहे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 09:54 PM2018-02-01T21:54:44+5:302018-02-01T21:55:08+5:30
एसटी बसस्थानकावर अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी गेले असताना वाहतूक पोलिसांकडून होणाºया कारवाईने यवतमाळातील वाहनधारक प्रचंड त्रस्त आहे. बसस्थानकावर वाहन ठेवण्यासाठी तात्पुरती कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : एसटी बसस्थानकावर अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी गेले असताना वाहतूक पोलिसांकडून होणाºया कारवाईने यवतमाळातील वाहनधारक प्रचंड त्रस्त आहे. बसस्थानकावर वाहन ठेवण्यासाठी तात्पुरती कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही. त्यात उलट कारवाईचा सामना करावा लागत असल्याने एसटी आगार प्रमुख व विभाग नियंत्रकाविरुद्ध तीव्र असंतोष पहायला मिळतो आहे. यातूनच विभाग नियंत्रकांना भविष्यात युवक कार्यकर्त्यांच्या उग्र आंदोलनाचा अचानक सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुणीही व्यक्ती आपल्या नातेवाईकाला सोडण्यासाठी यवतमाळच्या एसटी बसस्थानकावर गेल्यास तो आपले वाहन अवघ्या पाच-दहा मिनिटासाठी कुठे तरी साईडने पार्क करतो. परंतु तो परत येईपर्यंत वाहतूक पोलिसांच्या टोर्इंग व्हॅनने त्याचे वाहन उचलून नेलेले असते. गेल्या काही महिन्यात शेकडो प्रवाशांना या कारवाईचा सामना करावा लागला. एसटी बसस्थानकात वाहनांच्या पार्किंगसाठी अधिकृत कुठेही जागा नाही. याबाबत विचारणा केल्यास सायकल स्टँडवर आपली वाहने ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अवघ्या पाच-दहा मिनिटाच्या कामासाठी सायकल स्टँडवर आपले वाहन लावण्यासाठी वेळ व पैसा खर्ची घालणे कुणालाही परवडणारे नाही. विशेष असे सदर सायकल स्टँड संचालकाचाच बसस्थानकातील उभ्या असलेल्या दुचाकी-चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी आग्रह असतो. वेळप्रसंगी वाहतूक पोलिसांशीही ही कारवाई व्हावी म्हणून हुज्जत घातली जाते. कित्येकदा तर एसटीची यंत्रणाच कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना पाचारण करते. सायकल स्टँड मिळविण्यासाठी एसटी महामंडळाकडे भरलेल्या पैशाची वसुली व्हावी म्हणून दुचाकी वाहनधारकांवर तात्पुरत्या पार्किंग पोटी थेट दंडात्मक कारवाईचा आग्रह राहत असल्याची प्रवाशांची ओरड आहे. या प्रकरणात एसटी व वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांची सायकल स्टँडच्या यंत्रणेसोबत मिलिभगत असण्याची शक्यता काही वाहनधारकांनी बोलून दाखविली आहे. एसटी बसस्थानकातील या सक्तीच्या कारवाईचा फटका अनेकदा सकाळी विविध वृत्तपत्रांचे वितरण करणाºया वितरकांनाही सहन करावा लागतो आहे. त्यांची वाहने उचलून नेण्याचे प्रकारही घडले आहेत.
एसटीच्या विभाग नियंत्रक व यवतमाळ आगार प्रमुखांनी आधी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरुपात का होईना पार्किंगची जागा उपलब्ध करून द्यावी व नंतरच वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाईसाठी बसस्थानकात एन्ट्री द्यावी, अशी एकमुखी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
प्रवाशांच्या असुविधांकडे दुर्लक्ष
एसटी बसस्थानकावर पार्किंग नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे आगार प्रमुख व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याठिकाणी पाकिटमारी देखील मोठ्या प्रमाणात चालते. अनेक घटना घडूनही पोलिसांच्या निर्देशाला केराची टोपली दाखवित येथे सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लागलेले नाहीत. अशा एक ना अनेक अडचणी एसटी प्रवाशांपुढे आहेत. सोबत आणलेले वाहन सांभाळत महिला व वृद्धांसाठी जागा पकडण्याची सर्कस नागरिकांना करावी लागत आहे. या त्रासामुळे अनेकांनी खासगी बसेसना प्राधान्य देणे सुरू केले आहे.