संयमाचा कडेलोट! गावकरी वीज उपकेंद्रावर धडकले, कुलूप ठोकले
By विलास गावंडे | Published: September 3, 2023 06:13 PM2023-09-03T18:13:04+5:302023-09-03T18:13:14+5:30
वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. कंपनीचे अधिकारी तक्रार करूनही लक्ष देत नाही.
यवतमाळ : वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. कंपनीचे अधिकारी तक्रार करूनही लक्ष देत नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वीज कंपनीच्या उपकेंद्रावर धडक देऊन आपला रोष व्यक्त केला. केंद्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. रस्ता अडवून धरल्याने नेर-बाभूळगाव मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथे रविवारी दुपारी १२ वाजता घडला.
दाभा येथील ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राअंतर्गत दाभासह विविध गावातील नागरिकांना वीज समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हा प्रश्न अनेकदा कंपनीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आला. कुणीही याकडे लक्ष देत नसल्याने सरपंच वंदना दोडगे यांच्यासह नागरिकांनी उपकेंद्रावर धडक दिली. केंद्राला कुलूप लावल्याने कर्मचाऱ्यांना बाहेर थांबावे लागले.
नागरिक उपकेंद्रावर धडकल्यानंतर सरपंचांनी या केंद्राशी संबंधित अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क केला. परंतु अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे नागरिक आणखी संतापले. त्यांनी आंदोलन सुरू केले. रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. दाभा येथे मागील चार-पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीही वीज पुरवठा खंडित होतो. याचा संताप यावेळी दिसून आला. दरम्यान, याठिकाणी पोलिस दाखल झाले.
दुपारी ५ वाजताच्या सुमारास वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता डाबरासे या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत नागरिकांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगून वीज पुरवठा सुरू केला. विजेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ आणि गावकऱ्यांशी चर्चा घडवून आणली जाईल, असे अभियंता डाबरसे यांनी यावेळी सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दाभा उपकेंद्राला निवासी लाईनमन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात दाभा, पहूर, गळव्ही, डेहणी, आदी गावातील नागरिक सहभागी झाले होते.