वन आगारातील टेम्पो चोरून भंगारामध्ये ६० हजारात विकला; दीड महिन्यानंतर कारवाई 

By विशाल सोनटक्के | Published: May 16, 2024 07:39 PM2024-05-16T19:39:23+5:302024-05-16T19:39:42+5:30

नांदेड जिल्ह्यातील आरोपींचा समावेश

Tempo from Forest Agar was stolen and sold as scrap for 60,000 Action after a month and a half | वन आगारातील टेम्पो चोरून भंगारामध्ये ६० हजारात विकला; दीड महिन्यानंतर कारवाई 

वन आगारातील टेम्पो चोरून भंगारामध्ये ६० हजारात विकला; दीड महिन्यानंतर कारवाई 

उमरखेड (यवतमाळ) : अवैधरीत्या मातीचे उत्खनन करून वाहतूक करणारा टेम्पो वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून वन आगारामध्ये ठेवला होता. सदर टेम्पो १ एप्रिल रोजी चोरीस गेला होता. याप्रकरणातील आरोपींना पकडण्यास दीड महिन्यानंतर यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकासह सात जणांना ताब्यात घेतले आहे. आता चोरीचा टेम्पो खरेदी करणाऱ्याचा पोलिस पथक शोध घेत आहे. सदर टेम्पो भंगारात ६० हजारात विकल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

अवैध माती उत्खनन करून वाहतूक करत असताना शंकर पिराजी हरकरे यांचा टेम्पो (क्र. एमएच २७ सी ०५२०) हा वन विभागाच्या पथकाने पकडला होता. कारवाई होईपर्यंत हा टेम्पो नागापूर रुपाला येथील वन आगारात ठेवण्यात आला होता. मात्र, १ एप्रिल रोजी मध्यरात्री आगारातून अज्ञात इसमांनी हा टेम्पो पळवून नेला. या घटनेनंतर वन विभागात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करीत होते. पथकाने १४ मेच्या रात्री देशी कट्टा बाळगणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. 

या युवकांची विचारपूस सुरू असताना त्यांच्याकडून टेम्पो चोरीचे धागेदोरे मिळाले. नागापूर रुपाला येथील सय्यद समीर सय्यद करीम याने वन आगारातून टेम्पो चोरून नेला. तो शेख सरदार यांच्याकडे टेम्पो घेऊन गेला. शेख याने नांदेड येथील शेख करीम शेख पाशा (रा. देगलूर रोड, नांदेड) याच्या भंगार दुकानात सदर टेम्पो ६० हजार रुपयात विकला होता. देशी कट्टा प्रकरणातील आरोपी शेख वाजीत उर्फ शेख सरदार याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सय्यद समीर सय्यद करीम (रा. नागपूर रुपाला) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने साथीदारांची तसेच टेम्पो विकला त्या भंगार दुकानदाराचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
 
...या सहा जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
या प्रकरणात पोलिसांनी सय्यद समीर सय्यद करीम (२०), शाहिद खान जावेद खान (१९), शेख जुबेर शेख जब्बार (१९), मस्तान खान मलंग खान (२०), शेख वाजिद उर्फ शेख सरदार उमर (२४, रा. ताजनगर, हिंगोली नाका नांदेड) आणि भंगार दुकानदार एजाज काजी शिराजुद्दीन काजी (३६, रा. गाडेगाव रोड, इक्बालनगर, नांदेड) या सहा जणांना अटक केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन गजभारे, पोलिस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड आणि पोलिस शिपाई मोहम्मद ताज यांनी पार पाडली. सदर प्रकरणातील टेम्पो अद्याप हस्तगत केलेला नाही. आरोपींच्या अटकेनंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी उमरखेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Tempo from Forest Agar was stolen and sold as scrap for 60,000 Action after a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.