चिमुरड्यांच्या मृत्यूचे रोज आकडे मोजायचे का?, १५ दिवसांत १० जणांचा तापाने फणफणून गेला जीव
By विशाल सोनटक्के | Published: October 13, 2023 10:55 AM2023-10-13T10:55:16+5:302023-10-13T10:56:38+5:30
कुठे आहे यंत्रणा ? : जिल्ह्यात डेंग्यूची साथ नसल्याचा दावा
विशाल सोनटक्के
यवतमाळ : मागील साधारण १५ दिवसांमध्ये जिल्ह्यातील दहा चिमुकल्यांचा तापाने फणफणून मृत्यू झाला आहे. डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याचे कारण पालकांकडून सांगितले जात असले तरी आरोग्य विभाग मात्र जिल्ह्यात डेंग्यूची साथ नसून हे मृत्यू विविध व्हायरसमुळे झाल्याचा दावा करीत आहे. एकाही रुग्णाच्या नातेवाइकांकडे डेंग्यू पाॅझिटिव्हचा रिपोर्ट नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. कारण काहीही असले तरी जिल्हाभरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी तोबा गर्दी आहे आणि चिमुकले वाढत्या तापाचे बळी ठरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थितीत आराेग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा मात्र अद्यापही कुंभकर्णी झोपेत असल्याचे संतापजनक चित्र आहे.
महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथील सहा महिन्यांचा शायान आणि हिवरासंगम येथील नऊ महिन्यांची सुरेखा या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे २ ऑक्टोबर रोजी पुढे आले. सुरेखाला ताप आल्याने यवतमाळच्या रुग्णालयात भरती केले होते. तेथेच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी महागाव तालुक्यातीलच ओंकार नरवाडे याचा मृत्यू झाला. ताप आल्याने त्याच्यावर प्रारंभी पुसद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तेथून परतताना त्याचा मृत्यू झाला.
८ ऑक्टोबर रोजी नेर येथील साहील खांडेकर तर सोनखास हेटी येथील कर्तव्य झांबरे या दोघांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. साहील अवघ्या १२ वर्षांचा तर कर्तव्य हा चार वर्षांचा होता. साहीलवर नेरच्या खासगी रुग्णालयात उपचार केले, मात्र ताप कमी होत नसल्याने त्याला यवतमाळला हलविले. तर कर्तव्यचा यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांच्याही पालकांनी वाढत्या तापामुळेच मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
९ ऑक्टोबर रोजी बोरीअरब येथील उन्नती मेश्राम या ९ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. दारव्हाच्या उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मृत्यूने तिची पाठ सोडली नाही. १० ऑक्टोबर रोजी महागाव तालुक्यातील टेंभी येथील १२ वर्षीय चैतन्य चिलकर याचा मृत्यू झाला. ताप आल्याने त्याच्यावर गावातच उपचार करण्यात आले. त्यानंतर महागावच्या खासगी रुग्णालयात उपचार करून नंतर सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
११ ऑक्टोबर रोजी यवतमाळ तालुक्यातील वरुड येथील ऋतिका उमरे या १५ वर्षीय विद्यार्थिनीचा सावंगी मेघे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वडगाव येथील सुभाषचंद्र बोस विद्यालयात ती शिकत होती. याच दिवशी देऊरवाडी लाड येथील १३ वर्षांच्या तनिष्का नरे या विद्यार्थिनीचा तापाने फणफणून मृत्यू झाला. प्रारंभी तिच्यावर महागाव कसबा येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, ताप वाढल्याने यवतमाळला हलविले. तेथेच तिचा मृत्यू झाला. तर १२ ऑक्टोबर रोजी प्रीतम उके या ११ वर्षीय चिमुरड्याच्या मृत्यूची बातमी धडकली. आर्णी तालुक्यातील जवळा येथील श्री गुरुदेव विद्या मंदिरमध्ये सहावीत शिकत असलेल्या प्रीतमचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. मृत्यू पावलेल्या सर्वच चिमुरड्यांच्या पालकांनी मुलाला ताप होता आणि तो वाढत गेला असे सांगत डेंग्यूची शक्यता वर्तविली आहे. आरोग्य विभाग मात्र जिल्ह्यात डेंग्यूची साथ नसल्याचा दावा करीत आहे.
हे मृत्यू डेंग्यू झालेले नसून व्हायरसमुळे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साथ रोग नियंत्रणासाठी प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ पथकांची निर्मिती करण्यात आली असून, एका पथकाकडे दोन तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी आणि सहायक आरोग्य अधिकारी यांचा या पथकामध्ये समावेश आहे. दुसरीकडे जिल्हाभरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आरोग्य विभाग आठ पथकांवर साथीचा आजार आटोक्यात आणण्यावर निर्भर दिसते आहे.
आठ हजार चाचण्या अन् २४३ पॉझिटिव्ह
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यातर्फे विविध चाचण्या हाती घेण्यात आल्या असून यात प्रामुख्याने डेंग्यूची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ हजार रुग्णांची चाचणी घेतली गेली असून त्यामध्ये २४३ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी सुरू आहे. सध्याचे वातावरण दमट असल्याने वातावरणात साथरोग पसरण्याची पोषक स्थिती आहे. ही स्थिती लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षाही आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, इन्फ्ल्यून्झा, डेंग्यू, सर्दी, खोकला, गोवर यासह व्हायरस पसरत आहे. काही रुग्णांमध्ये अॅडव्हान्स निमोनियाचा प्रकार आढळला. लेप्टो मॅनेजीएल इन्सपीलायटी व्हायरस मेंदूत शिरून रुग्ण गंभीर झाल्याच्या घटनाही तपासणीतून पुढे आल्या आहेत.
डेंग्यूसह टायफाइडचेही रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. दूषित पाणी आणि अन्न यामुळे टायफाइड पसरत आहे. या प्रकारात बारीक ताप येणे, अंग दुखणे आदी प्रकार पाहायला मिळत आहेत. डेंग्यू आजाराला न घाबरता परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील झालेले मृत्यू डेंग्यूने नसून विविध प्रकारच्या व्हायरसने झाले आहेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, याशिवाय आरोग्य विभागाचे पथक विविध ठिकाणी तपासण्या आणि कारवाया करीत आहे.
- तन्वीर शेख, जिल्हा हिवताप अधिकारी