मेडिकलसाठी दहा डायलिसीस युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:34 PM2019-07-17T21:34:34+5:302019-07-17T21:34:49+5:30
जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील किडणीच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. शिवाय विषबाधा झालेल्या रुग्णांनाही डायलिसीसची गरज भासते. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वर्षांपासून डायलिसीसची मागणी होती. प्रशासनाच्या स्तरावर दोन डायलिसीस युनिट सुरू करण्यात आले. मात्र ते अपुरे पडत होते. अखेर जिल्हा नियोजन समितीने खनिज विकास निधीतून डायलिसीस युनिटसाठी ५५ लाख ४४ हजारांची तरतूद केली. दहा डायलिसीस मशीन मंजूर झाल्या आहेत.
डायलिसीस सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील किडणी आजार झालेल्या रुग्णांना डायलिसीससाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. अनेकदा खासगीत उपचार घ्यावा लागत होता. यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती. डायलिसीस वारंवार घेतला तरच रुग्ण वाचू शकतो. मात्र आर्थिक अडचणी असल्याने गरीब रुग्णांना ते न परवडणारे होते. मेडिकलमध्ये दोन डायलिसीस युनिट बेवारस पडून होते. याबाबत अभ्यागत मंडळातही त्यावेळी चर्चा झाली. अखेर अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार यांनी तातडीने उपाययोजना करीत हे दोन युनिट सुरू केले. रुग्ण संख्या जास्त असल्याने हे युनिट अपुरे पडू लागले. रुग्णांना रेफर करावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासोबत या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करून प्रस्ताव सादर केला व तो शासनाकडे तसेच हापकिन इन्स्टिट्युटकडे पाठविण्यात आला. हापकीनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. आता मेडईन जर्मन कंपनीचे डायलिसीस मशीन खरेदी केले जाणार आहे. त्याचा पुरवठा मेडिकल केअर इंडिया प्रा. लि. यांच्याकडून होणार आहे. १२ आठवड्याच्या आत ही मशीन मेडिकलमध्ये प्राप्त होणार असून एकाच वेळी दहा ते बारा रुग्णांना डायलिसीसवर ठेवता येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार केला जाणार आहे.
याशिवाय मेडिकलमध्ये शिर्डी येथील साई संस्थानकडून १३ कोटींच्या एमआरआय मशीन करिता आर्थिक तरतूद झाली आहे. खनिज विकास निधीतूनही एक कोटी ३१ लाख रुपये मंजूर झाले आहे. डायलिसीस व एमआयआर मशीन यामुळे येथील उपचाराचा दर्जा अधिक उंचावणार आहे.