दहा विषय समित्या आणि ८३ सदस्य
By admin | Published: May 9, 2017 01:16 AM2017-05-09T01:16:17+5:302017-05-09T01:16:17+5:30
जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांवर ८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. मंगळवार ९ मे रोजी ही निवड प्रक्रिया होणार आहे.
जिल्हा परिषदेत आज निवडणूक : स्थायी, बांधकामसाठी जोर, दोन-दोनचा फॉर्म्युला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या दहा विषय समित्यांवर ८३ सदस्य निवडून द्यायचे आहेत. मंगळवार ९ मे रोजी ही निवड प्रक्रिया होणार आहे. त्यात जिल्हा परिषदेचे कॅबिनेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समिती आणि सर्वाधिक वरकमाईचा स्त्रोत असलेल्या बांधकाम समितीसाठी सदस्यांमध्ये जोरदार स्पर्धा पहायला मिळते आहे.
बहुतांश समित्यांवर आठ सदस्य आहेत. केवळ कृषी, समाज कल्याण आणि जलव्यवस्थापन व स्वच्छता या समित्यांवर अनुक्रमे १०, ११ व ६ सदस्य निवडले जाणार आहेत. शिक्षण, बांधकाम, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्ध शाळा, अर्थ, महिला व बालकल्याण या समित्यांवर प्रत्येकी आठ सदस्य निवडून द्यायचे आहेत. सर्वसंमतीने नावे निश्चित व्हावी, निवडणूक घेण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवसेना विरोधी बाकावर आहेत. या चारही पक्षांनी प्रत्येकी दोन-दोन सदस्य समित्यांवर घ्यावे, असे ढोबळ समीकरण ठरले असल्याची चर्चा आहे. मात्र ऐनवेळी त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांधकाम विभागात होणारी ‘उलाढाल’ लक्षात घेता अनेक सदस्य या समितीसाठी आग्रही आहेत. त्यानंतर शिक्षण व आरोग्य समितीला पसंती दर्शविली जात आहे. अन्य समित्यांना मात्र सदस्यांकडून तेवढे महत्व दिले जात नाही. स्थायी समितीत काँग्रेसमधून कोण याचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी काँग्रेसच्या नेते व सदस्यांची बैठकही बोलविण्यात आली आहे.
काँग्रेसचे गटनेते स्थायी समितीसाठी स्पर्धेत
स्थायी व बांधकाम या समित्यांसाठी सर्वाधिक रस्सीखेच आहे. काँग्रेसकडून गटनेते राम देवसरकर यांचा जोर आहे.
पहिल्याच बैठकीत ‘परफॉर्मन्स’ न दाखविणे, पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहणे यामुळे गटनेत्याबाबत काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी पहायला मिळते. शिवाय सभागृहाचे सत्ताधारी पक्षाचे गटनेते हे पद असताना आणखी पद कशासाठी असा काँग्रेसच्या गोटातील सवाल आहे.
स्थायी समितीसाठी माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या विधानसभा मतदारसंघातील स्वाती येंडे, प्रा. वसंतराव पुरके यांच्या मतदारसंघातील जया पोटे यांची नावेही चर्चेत आहेत.
या पैकी कुणाची वर्णी लागते यावर नजरा आहेत. यापैकी एका सदस्याला बांधकाम समितीकडे वळविले जाण्याची शक्यता आहे.