गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:00 AM2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:00:03+5:30

जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती.

Ten thousand aspirants in village politics | गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

गावच्या राजकारणात दहा हजार इच्छूक

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उसळली उमेदवारांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ : जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला पार पडणार आहेत. या निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस होता. ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली. यामुळे शेवटच्या दिवशी चौपट गर्दी वाढली. अर्ज स्वीकारण्यासाठी वेळ वाढविण्यात आला. यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. २९ तारखेपर्यंत आठ हजार ४९० उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी गर्दी वाढल्याने उमेदवारांची संख्या दहा हजारांच्यावर पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली होती. 
उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे जातवैधता प्रमाणपत्रासाठीही स्लीप जोडण्यासाठी मुभा देण्यात आली होती. तर ज्या उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रिया पार पाडली, त्याकरिता अवास्तव पैसे संगणक केंद्र चालकांनी उमेदवारांकडून घेतले. याप्रकरणी उमेदवारांनी संताप नोंदविला. शिवाय पूर्वीपासूनच ऑफलाइन स्वरूपाची प्रक्रिया पार पाडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. 
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षासोबतच नवख्यांना संधी मिळाली आहे. ऑफलाइन प्रक्रियेने अनेक इच्छुकांना शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करता आले. यामुळे ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार होत्या, त्या ठिकाणी आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवाय प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढलेली दिसणार आहे.  या निवडणुकीसाठी १४ लाख २० हजार ४४७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. काही नवोदित मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये चित्र बदलण्याची स्थिती आहे.  
गाव विकासाचा अजेंडा घेऊन प्रत्येक पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरला आहे. नवख्यांना संधी देण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून आणि विरोधी गटाकडूनही होत आहे. या निवडणुकीमध्ये महिला बचत गटांची भूमिका गावपातळीवर महत्त्वाची राहणार आहे. बचत गटांच्या महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वोट बँक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तर गावातील तरुण वर्गाला आपल्या पॅनलकडे आकर्षित करण्यासाठी तरुण उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.
सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात 
 ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांना बंदी असली तरी सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. मुक्त चिन्ह घेऊन हे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी विविध समीकरणांचा वापर ग्रामपंचायतीवर केला आहे. यामुळे या उमेदवारांना राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह नसले तरी स्थानिक मुक्त चिन्हांवर ही निवडणूक लढली जाणार आहे. 
 ग्रामपंचायत विकास कामांसाठी वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात थेट वळता होत आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीपेक्षाही सर्वाधिक महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीला आले आहे. लोकसंख्येच्या आधारावर विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतीला वळता होत आहे. यामुळे प्रत्येक पॅनल आपण विकास घडवून आणू, असे आश्वासन देत आहे.

१५ जानेवारी रोजी फैसला
जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले. यामुळे १५ जानेवारीला उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये तीन हजार ७३ जागांसाठी २९ डिसेंबरपर्यंत आठ हजार ४९० अर्ज दाखल झाले होते. ३० तारखेला हा आकडा अंतिम व्हायचा होता. उमेदवारांची ही संख्या १० हजारांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. एका प्रभागामध्ये एका जागेसाठी तीन ते चार उमेदवार उभे राहण्याची चिन्हे आहेत. ३१ तारखेला अर्जांची छाननी आहे. ४ जानेवारीला नामनिर्देशन परत घेतले जाणार आहे. यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: Ten thousand aspirants in village politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.