सोयाबीनचे दर दहा हजार; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:25+5:302021-08-12T04:47:25+5:30
तालुक्यात ५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात येत असते. चांगले उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी या क्षेत्रात वाढ ...
तालुक्यात ५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात येत असते. चांगले उत्पन्न मिळत असल्याने दरवर्षी या क्षेत्रात वाढ होत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पडलेल्या भावात सोयाबीन विकले. सुरुवातीला तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला; मात्र नंतर सोयाबीनच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. शेतात सोयाबीनचे पीक उभे आहे आणि बाजारात सोयाबीनला १० हजार रुपये दर मिळत आहे. हातात शेतमाल नाही, पण सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. बाजार समितीत सोयाबीनचा दर १० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील काही दिवसांमध्ये या दरात अडीच हजार रुपयांनी वाढ झाली; मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसून, व्यापाऱ्यांना होणार असल्याचे दिसून येते. पावसाळा सुरू असल्याने शेतकऱ्यांजवळ शेतमाल शिल्लक नाही; मात्र मागील महिनाभरात सोयाबीनचे दर झपाट्याने वाढत आहेत. ही कृत्रिम तेजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा मशागतीसोबत बियाणे, खतांचे दर वाढले आहे. त्यामुळे शेतीचा खर्चही वाढला आहे. सोयाबीनची १२ एकरात पेरणी केली असून, बाजारात सध्या सोयाबीनला चांगला दर मिळतो; परंतु या दरवाढीचा फायदा नाही. जागतिक बाजारपेठेच्या दराचा शेतकऱ्यांना फायदा नाही. आता सोयाबीनला विक्रमी दर मिळत असले तरी शेतकरी सोयाबीन विकून बसले आहेत. ऐन हंगामात बाजारात शेतमालाला दर नसतो.