मारेगाव तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची मुदत संपली, कामकाज ठप्प : प्रशासक नियुक्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:17+5:302021-07-17T04:31:17+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व निवडणुका स्थगित आहेत. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता आता जागतिक आरोग्य ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व निवडणुका स्थगित आहेत. अशातच तिसऱ्या लाटेची शक्यता आता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातच तालुक्यातील सराटी, वाघदरा, जळका, वरूड, मच्छिंद्रा, डोलडोंगरगाव, खंडणी, सगनापूर, कान्हाळगाव, गोधणी, अर्जुनी या ११ ग्रामपंचायतींची मुदत १५ एप्रिल २०२१ रोजी संपली आहे. त्यामुळे सरपंचाचे अधिकार संपुष्टात आल्याने गावगाड्याचा व्यवहार ठप्प झाला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणे आवश्यक असताना अजूनही ही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यातील गावांच्या समस्या कशा सोडवाव्यात, हा प्रश्न निर्माण होणार आहे. यापूर्वीसुद्धा मुदत संपलेल्या तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते; परंतु नियुक्त प्रशासक गावातच जात नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात, हा गावकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे प्रशासक नेमण्यापेक्षा निवडणुका पार पडेपर्यंत विद्यमान सरपंचांना मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.