यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:01 PM2020-05-21T18:01:10+5:302020-05-21T18:11:23+5:30
राळेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी अनेकांना चावा घेतला. या घटनेची माहिती गावात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी अनेकांना चावा घेतला. या घटनेची माहिती गावात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. काही मिनिटातच १४ जणांना या कुत्र्याने गंभीर स्वरूपाचा चावा घेतला.
दैनंदिन कामकाजासाठी राळेगावकर नागरिक घराबाहेर निघाले असता बाजारपेठेत फिरणाऱ्या कुत्र्याने चावा घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला एक-दोघांना या कुत्र्याने चावा घेतला असावा, अशी माहिती होती. मात्र राळेगाव ग्रामीण रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्याचे रुग्ण एका पाठोपाठ एक यायला सुरुवात झाली. यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून आले. अखेर याची माहिती नगरपंचायतीला देण्यात आली. नगरपंचायतीने तातडीने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी दिलेल्या आदेशावरून आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून ठार केले. त्यानंतर राळेगावकर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. ग्रामीण रुग्णालयात ११ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश चिमणानी यांनी ‘लोकमत’ला दिली.