पांढरकवडा तालुक्यात चोरट्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:49 AM2021-09-24T04:49:17+5:302021-09-24T04:49:17+5:30
जिल्हा पातळीवरून अवैध धंदे पूर्णता बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र, तरीही तालुक्यातील सीमावर्ती भागात अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे ...
जिल्हा पातळीवरून अवैध धंदे पूर्णता बंद करण्याचे आदेश आहेत. मात्र, तरीही तालुक्यातील सीमावर्ती भागात अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. सीमावर्ती भागात जनावर तस्करी, मटका काउंटर तसेच जुगार सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. चोऱ्याच्या वाढत्या घटना बघता रात्र गस्तीची गरज निर्माण झाली आहे. प्रभावी गस्त नसल्याने तसेच गस्त घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने गस्तीवरील कर्मचारी मध्यरात्रीनंतर गस्तीला दांडी मारतात, अशी ओरड आहे. बऱ्याच वेळेस पोलिसांची वाहने फक्त मुख्य रस्त्याने फिरतात. छोटे रस्ते, अरुंद रस्त्यावर कधीच पोलिसांचे वाहन जात नाहीत. त्यामुळे साहजिकच चोरट्यांना आयते रान मोकळे होते. या परिस्थितीमुळे चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही. शहरातील कुंदननगरमधील घरफोडी, तालुक्यातील पिंपळशेंडा फाट्यावरील ट्रक चालकास मारहाण करून लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढत असल्याचेच दिसून येत आहे. पोलिसांसमोर या चोरट्यांनी एकप्रकारे आव्हानच उभे केल्याचे दिसून येत आहे.