‘पीआरसी’ने नोंदविली सीईओंची साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:00 AM2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:00:02+5:30
आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील पंचायतराज समिती मंगळवारी यवतमाळात दाखल झाली. पहिल्या दिवशी आमदार विक्रम काळे, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे सोबत होते. मंगळवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पक्षाची बैठक बोलविल्याने शिवसेनेचे आमदार सहभागी होऊ शकले नाही. मात्र, हे आमदार बुधवारपासून पीआरसीच्या दाैऱ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य विधिमंडळाची पंचायतराज समिती (पीआरसी) तीन दिवसीय जिल्हा दाैऱ्यावर असून, मंगळवारी या समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली.
आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील पंचायतराज समिती मंगळवारी यवतमाळात दाखल झाली. पहिल्या दिवशी आमदार विक्रम काळे, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे सोबत होते. मंगळवारी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पक्षाची बैठक बोलविल्याने शिवसेनेचे आमदार सहभागी होऊ शकले नाही. मात्र, हे आमदार बुधवारपासून पीआरसीच्या दाैऱ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी असा तीन दिवस पीआरसीचा दाैरा आहे. या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे महिनाभरापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये तयारी, रेकाॅर्ड अपडेशन सुरू होते.
मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे पंचायतराज समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी या समितीसोबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती नसल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ही समिती दुपारी १२.३० वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात पोहोचली. तेथे सन २०१०-११ व २०१६-१७ च्या लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवालावर चर्चा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची साक्ष समितीने नोंदविली. यावेळी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अभियंते, कॅफो, बीडीओ, शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. हे अधिकारी साक्षच्या वेळी उपस्थित होते. स्थानिक निधी लेखा विभागाने ऑडिट करताना खर्चावर नोंदविलेले आक्षेप, त्याची परिपूर्तता, आक्षेप वगळणे, संबंधितावर कारवाई, दंडवसुली, अपहाराच्या रकमेची वसुली, प्रलंबित लेखा आक्षेप अशा विविध मुद्द्यांवर पंचायतराज समितीने फोकस निर्माण केला. पंचायतराज समितीचा मंगळवारचा पहिला दिवस शांततेत पार पडला. बुधवारपासून ही समिती ग्रामीण भागात धडक देणार आहे.
पंचायतराज समितीची ग्रामीण यंत्रणेत दहशत
वेळप्रसंगी जागीच निलंबित करण्याचे अधिकार असलेल्या विधिमंडळाच्या पंचायतराज समितीची जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या यंत्रणेमध्ये, एवढेच नव्हेतर पदाधिकाऱ्यांमध्येसुद्धा कमालीची दहशत पाहायला मिळते. मात्र, ही दहशत काहीशी आदरयुक्तही आहे. यापूर्वी पंचायतराज समितीचा दोनवेळा मुहूर्त टळला होता. यावेळी कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरसुद्धा पीआरसी येणार की नाही, अशी साशंकता यंत्रणेतून ऐकायला मिळत होती. परंतु अखेर एकदाची पीआरसी धडकली.
पीआरसी येणार म्हणून महिनाभरापासून जिल्हा परिषदेची वणी ते उमरखेडपर्यंतची यंत्रणा कमालीची सक्रिय झाली होती. नागरिकांनी अनेक कर्मचाऱ्यांना तर पहिल्यांदाच एवढ्या गतीमानतेने काम करताना पाहिल्याचाही अनुभव सांगितला. ही पंचायतराज समिती आता जिल्ह्यात नेमकी कुठे भेटी देणार, यावर संपूर्ण यंत्रणेच्या नजरा आहेत. आपल्या तालुक्यात, कार्यालयात, गावात, शाळेत, केंद्रात येऊ नये, यासाठी जणू तेथील यंत्रणा देव पाण्यात बुडवून बसल्याचे चित्र आहे. या भेटीबाबत फोनवरून सातत्याने कानोसा घेण्याचा प्रयत्नही होतो आहे.
पंचायतराज समितीच्या सरबाराईत कोणतीही कसर राहू नये, उगाच त्यांची नाराजी नको म्हणून महिनाभरापासून खास टार्गेटही दिले गेले आहे. त्यांच्या सरबराईत यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे. काहीही कमी पडू नये या दृष्टीने काळजी घेतली जात आहे.
पहिल्या दिवशी पीआरसीचे सातच सदस्य असले तरी बुधवारपासून ही संख्या वाढणार आहे. त्यामुळे पीआरसी वेगवेगळ्या गटात विभागून वेगवेगळ्या दिशेने दाैरा करते की सर्वजण एकाच दिशेने निघतात, यावर नजर आहे.