डीएड, बीएड करतानाच आता देऊ शकता टीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 07:30 AM2021-08-28T07:30:00+5:302021-08-28T07:30:02+5:30
Yawatmal News शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यापासून यावर्षी परीक्षा परिषदेने डीएड आणि बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले होते. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाने टीईटीचे अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.
अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यापासून यावर्षी परीक्षा परिषदेने डीएड आणि बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले होते. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दिलासा देत, टीईटीचे अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना बजावले. (TET can now be given while doing D.ED, B.ED)
राज्यात २०११ पासून शिक्षक भरती बंद असल्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणारे हजारो विद्यार्थी शिक्षक होण्यापासून वंचित आहेत. त्यातच २०१७ पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कशीबशी सुरू झालेली भरतीही अर्धवट आहे, दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षाही (टीईटी) घेतली गेली नाही. त्यामुळे डीएड, बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ३ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, केवळ डीएड आणि बीएड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाच टीईटी देता येईल, असा फतवा परीक्षा परिषदेने काढला. त्यामुळे सध्या कोरोनाच्या तणावग्रस्त काळातही डीएड आणि बीएडच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्रता परीक्षेपासून वंचित झाले.
या विरोधात विद्यार्थ्यांनी विद्यापीठापासून परीक्षा परिषदेपर्यंत आवाज उठविल्यानंतर अखेर शासनाला दखल घ्यावी लागली. आता डीएड आणि बीएडच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही टीईटी परीक्षा देता येईल, असा आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांनी बुधवारी निर्गमित केला. या नव्या बदलानुसार विद्याथ्यार्ना टीईटीचे आवेदन पत्र भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आदेश परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉ.तुकाराम सुपे यांना बजावण्यात आले. आता डॉ.सुपे यांच्या आदेशाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
टीईटीच्या अर्जांसाठी मुदतवाढ
१० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेकरिता उमेदवारांना ३ ते २५ ऑगस्ट या काळातच अर्ज भरायचे होते. मात्र, या वर्षी डीएड आणि बीएडच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल याकाळात लागण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे हे विद्यार्थी टीईटीचे अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती होती. ते बघता परीक्षा परिषदेने आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली. त्यातच राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही टीईटीसाठी पात्र ठरविल्याने डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांना दुहेरी दिलासा मिळाला आहे.
दोन सरकारमधील विसंगत धोरण
आरटीई या एकाच कायद्यानुसार केंद्र सरकार शिक्षक भरतीसाठी सीटीईटी घेते, तर राज्य सरकार टीईटी घेते. मात्र, सीईटी परीक्षा देण्यासाठी डीएड व बीएडच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मुभा दिली जाते, तर टीईटी परीक्षेसाठी अशा विद्यार्थ्यांना वगळले जाते. केंद्र आणि राज्य शासनाच्या या विसंगत धोरणामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते, परंतु आता राज्याच्या शिक्षण विभागाने ही चूक दुरुस्त केली आहे.
यंदा डीएड आणि बीएडच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुभा मिळेल. याबाबतच्या परवानगीचे शासनाचे पत्र मला मिळाले आहे. त्या अनुषंगाने संबंधितांना निर्देशही दिले आहेत.
- डॉ.तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.