टीईटी घोटाळ्याचा टायपिंगलाही फटका; दोन लाख विद्यार्थी अडचणीत, तीन महिने उलटूनही निकाल लागेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 07:24 AM2022-02-25T07:24:24+5:302022-02-25T07:25:24+5:30
शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे.
अविनाश साबापुरे
यवतमाळ : शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्टहॅण्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे. या दोन्ही परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून कारागृहात गेले आणि परिषदेचा कारभार ढेपाळल्याने गेल्या साडेतीन महिन्यांपासून कोणत्याही परीक्षेचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कुठेही अर्ज करता येत नाही.
टंकलेखन, संगणक टंकलेखन आणि लघुलेखन (शॉर्टहॅण्ड) या परीक्षांचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केले जाते. नोव्हेंबर २०२१मध्ये महाराष्ट्रातील दोन लाख विद्यार्थ्यांनी संगणक टंकलेखनाची परीक्षा दिली.
मात्र, ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या परीक्षेचा निकाल आता साडेतीन महिने उलटूनही परीक्षा परिषदेने जाहीर केलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील चार हजार टायपिंग इन्स्टिट्यूटपुढे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. टीईटी परीक्षाही नोव्हेंबरमध्येच झाली होती. टायपिंग उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिले. निकाल कधी येणार, असा तगादा हे विद्यार्थी इन्स्टिट्यूट चालकांकडे लावत आहेत. मात्र, त्याचे उत्तर कुणाकडेही नाही.
परीक्षा परिषदेचा जाच नेहमीचाच
- टायपिंग अभ्यासक्रमाचे ६-६ महिन्यांचे अशी वर्षातून दोन सत्र घेतली जातात. पहिल्या परीक्षेचा निकाल लागल्याशिवाय दुसऱ्या सत्राला ॲडमिशन मिळत नाही. मात्र, परीक्षा परिषद कधीही तीन महिन्यांच्या आत निकाल लावत नाही.
- त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे देण्यासाठीही तीन महिने विलंब केला जातो. याचा फटका विद्यार्थ्यांसह इन्स्टिट्यूट चालकांना सहन करावा लागतो. परीक्षेबाबत इन्स्टिट्यूटला ‘बॅच लिस्ट’ पाठविण्याची तसदीही परिषद घेत नाही.
- विशेष म्हणजे आधीचा निकाल लावलेला नसताना परीक्षा परिषदेने पुढील फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित परीक्षेचे अर्ज, शुल्कही भरून घेतले. मात्र, या परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.