सीसीआयकडे कापूस उत्पादकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:03 PM2017-10-30T22:03:05+5:302017-10-30T22:03:15+5:30
शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयने सोमवारी वणी येथे कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला खरा; पण पहिल्याच दिवशी कापूस उत्पादकांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली.
संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयने सोमवारी वणी येथे कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला खरा; पण पहिल्याच दिवशी कापूस उत्पादकांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली.
सोमवारी दुपारनंतर उद्घाटनाला केवळ दोन वाहनात भरलेला कापूस विक्रीसाठी पोहचला. ही दोनही वाहने मिळून सीसीआयने हमीभावाने १६ क्विंटल ४५ किलो कापूस खरेदी केला. या उलट खासगी व्यापाºयांनी शासकीय हमीभावापेक्षा चढ्या भावात कापूस खरेदी केला. त्यामुळे येथील एका खासगी बाजार समितीत सात हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.
शासकीय कापूस खरेदीच्या पहिल्याच दिवशी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. सीसीआयतर्फे कापूस खरेदीच्या उद्घाटनाची तयारी करण्यात आली. सुरूवातीला एक ते दोन शेतकरी कापूस घेऊन बाजार समितीत पोहचले. मात्र नव्या नियमानुसार या शेतकºयांकडे आॅनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेच नसल्याने सदर शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले. त्यानंतर दुपारी ३ वाजता कापसाने भरलेली केवळ दोन वाहने वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहचली. येथील महावीरा अॅग्रीकेअर या खासगी बाजार समितीत मात्र कापूस उत्पादकांची रिघ लागली होती. यंदा कपाशीला प्रती क्विंटल चार हजार ३२० रुपये हमी भाव असताना खासगी बाजार समितीत व्यापाºयांनी १२ टक्के आर्द्रतेवर चार हजार ३५० ते चार हजार ३८० रुपये प्रती क्विंंटल भाव दिला. सीसीआयतर्फे कपाशीला प्रती क्विंटल चार हजार ३२० रुपये हमी भाव दिला जात आहे. हा दर आठ टक्के आर्द्रता असेल तरच दिला जाणार आहे. त्यापेक्षा कपाशीत जास्त आर्द्रता असेल तर हमी भावानुसारच कापूस खरेदी केली जाणार की, दरात कपात करणार, याबाबत सीसीआयने गुप्तता पाळली आहे. मागील वर्षी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० पैसे सेस आकारण्यात येत होता. तो २ डिसेंबर २०१६ पर्यंत सुरू होता. त्यामुळे खासगी व्यापाºयांची येथे कापूस खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यानंतर ३ डिसेंबर २०१६ पासून ५० पैसे सेस आकारण्यात आला. मात्र बाजार समितीने सेस कमी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने त्याला मंजूर मिळून सेस कमी होईल, या आशेने खासगी व्यापाºयांनी याच ठिकाणी कापूस खरेदी केली. त्यामुळे मागील वर्षी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीतत विक्रमी साडेबारा लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी झाली. मात्र ५० पैसे सेस आकारण्यात आल्याने, कापूस व्यापाºयांनी हा सेस परवडणारा नसल्याचे कारण देत वणी बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे.
सोयाबीन खरेदीची शेतकºयांना प्रतीक्षा
दिवाळीचा सण झाल्यानंतरही नाफेडने अद्याप सोयाबीन खेरदीचा मुहूर्त शोधला नाही. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजाने कमी भावात खासगी व्यापाºयांना सोयाबीन विकावे लागत आहे. सोमवारी बाजार समितीत शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ५० रुपये असला तरी खासगी व्यापाºयांनी २६५० ते २७०० रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली.