माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:33 PM2017-09-27T23:33:03+5:302017-09-27T23:33:16+5:30

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली.

Text of former Chief Minister's district issues | माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ

माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ

Next
ठळक मुद्देकाँग्रेसने संधी सोडली : टिटवीतील शेतकरी आत्महत्या, वाघाचे हल्ले, फवारणीतून विषबाधा

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली. वास्तविक हे विषय काँग्रेसला राष्टÑीय-राज्य स्तरावर गाजविता आले असते. परंतु काँग्रेसने ही नामीसंधी सोडली.
कर्ज व नापिकीपायी होणाºया शेतकरी आत्महत्यांमुळे दुर्गम, आदिवासी बहुल यवतमाळ जिल्हा जगभर चर्चेत आला आहे. केंद्र व राज्यात सत्ता बदल होऊनही शेतकºयांच्या या आत्महत्या थांबविता आल्या नाहीत किंवा नियंत्रणातही आणता आलेल्या नाहीत. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे भाजपाचे ‘मिशन’ राज्यातच नव्हेतर जिल्ह्यातसुध्दा फेल ठरले. उलट ज्या आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावातून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात देशभरातील शेतकºयांशी ‘चाय पे चर्चा’च्या निमित्ताने संवाद साधला, त्याच मतदारसंघातील टिटवी (ता. घाटंजी) गावात शेतकºयाने मोदींच्या नावाने शिमगा करीत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या शेतकºयाने झाडाच्या पानावर ‘मोदी सरकार, शेतकरी आत्महत्या’ असे लिहिले. थेट पंतप्रधानांचा नामोल्लेख करून आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे हे प्रकरण काँग्रेसला राष्टÑीय मुद्दा बनविता आले असते. काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी टिटवी गावात तातडीने भेटी देऊन हा मुद्दा कॅश करणे अपेक्षित होते. परंतु दिल्लीचे तर दूर राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष किंवा अन्य प्रमुख नेतेही या टिटवी गावाकडे फिरकले नाहीत.
आदिवासी गावे भयभीत
टिटवीतील शेतकरी आत्महत्येशिवाय वाघाचा मानवी वस्त्यांमधील धुमाकूळ, शेतकरी-शेतमजूरांच्या शिकारी, पिकांवर कीटकनाशक फवारताना सहा जणांचा गेलेला बळी, सुमारे २०० शेतकरी-शेतमजुरांना झालेली लागण, त्यामुळे दृष्टी जाण्याचे, मेंदूवर परिणाम होण्याचे घडलेले प्रकार हे मुद्देही गाजत आहेत. वाघ माणसांची, जनावरांची शिकार करतो. मात्र वन विभागाला तो सापडत नाही. त्यामुळेच एसडीओंचे वाहन पेटवून रोष व्यक्त केला गेला. वाघाने पांढरकवडा विभागात आतापर्यंत सहा बळी घेतले. शेतकºयांची जनावरे फस्त केली. त्यामुळे आदिवासी गावे भयभित झाली आहे. या गावातील आदिवासी बांधवांना जणू वाघानेच क्षेत्रबंधनात अडकविल्याचे चित्र आहे.
शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जीविताशी संबंधित विषय गाजत असताना राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना त्या गावात भेटी देण्याची, हाकेच्या अंतरावरील शासकीय रुग्णालयात जाऊन विषबाधा झालेल्या शेतकºयांची भेट घेण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. या उलट सत्तेत असूनही भाजपाचे खासदार नाना पटोले पक्षाशी पंगा घेऊन भंडाºयाहून थेट टिटवीत पोहोचले. यावरून शेतकरी व जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस (सत्ता जाऊन साडेतीन वर्षे झाल्यानंतरही) खरोखरच किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

स्थानिक नेत्यांकडील भेटीला दिले अधिक महत्व
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने रविवार २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येऊन गेले. किमान ते तरी टिटवी गावाला भेट देतील, अशी अपेक्षा येथील पक्ष कार्यकर्ते आणि भाजपा सरकारला वैतागलेले शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांनी निराशा केली. स्थानिक नेत्यांकडील भेटी त्यांना अधिक महत्वाच्या वाटल्या. पुसद व यवतमाळातील ईनडोअर कार्यक्रमात हजेरीचा सोपस्कार आटोपून पृथ्वीराज चव्हाण रवाना झाले. त्यांच्या लेखी जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित राहिले. एकतर या प्रश्नांबाबत स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना अंधारात ठेवले असावे किंवा हे प्रश्न पक्षाला कॅश करुन देण्याची त्यांची इच्छाशक्ती नसावी, असे दिसते. टिटवीतील टळलेल्या या सांत्वन भेटीसाठी दोष कुणाचा ? स्थानिक नेत्यांचा की खुद्द माजी मुख्यमंत्र्यांचा हा विषय काँग्रेससाठी चिंतनाचा आहे.

Web Title: Text of former Chief Minister's district issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.