सरकारी उपक्रमाकडे अधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:29 PM2018-09-02T22:29:51+5:302018-09-02T22:30:36+5:30
आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाºयांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आदिवासी, कोलाम, पारधी, शेतकरी आदींचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमाकडे अधिकाऱ्यांनीच पाठ फिरविली. त्यामुळे गरिबांच्या कुठल्याही प्रश्नांवर सखोल चर्चा होऊ शकली नाही. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेविषयी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी संताप व्यक्त केला आहे.
आदिवासी विकास, ग्रामविकास, सिंचन, कृषी, महसूल, वन, आरोग्य, सहकार, वीज, शिक्षण, पोलीस आदी विभागाविषयी तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. यावर तोडगा निघावा यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांसह वासरी (ता. घाटंजी) कोलामपोड येथे ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांची उपस्थिती होती. पार्डी, साखरा, तरोडा, वडनेर, लिंगापूर, मोवाडा, पहापळ, टिटवी, राजूरवाडी, मारेगाव आदी ठिकाणचे नागरिक उपस्थित झाले होते.
या नागरिकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे अधिकारीच उपस्थित नव्हते. यामुळे उपस्थित नागरिकांचा हिरमोड झाला. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माधवराव टेकाम, भीमराव नैताम, बाबूलाल मेश्राम, लेतुजी जुनघरे, अंकीत नैताम, सविता जाधव आदींनी व्यक्त केली.
यावेळी नागरिकांनी पाणी, वीज, रस्ता, घरकूल, जात प्रमाणपत्र, आरोग्य आदी बाबी विषयी तक्रारी मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्याचे तीनतेरा वाजविल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.