आदिवासी विभागात बनावट सही-शिक्के
By admin | Published: July 12, 2014 01:47 AM2014-07-12T01:47:42+5:302014-07-12T01:47:42+5:30
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत तेल पंप मंजूर करून देण्याचे आमिष देत पुसद, महागाव तालुक्यातील लाभार्थ्यांची ...
पुसद : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत तेल पंप मंजूर करून देण्याचे आमिष देत पुसद, महागाव तालुक्यातील लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या तीन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध पुसद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी बनावट सही शिक्क्यांचा वापर करून लाभार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याची तक्रार आहे.
रमेश भांगे रा. साईइजारा, विलास गव्हांडे रा. पांगरवाडी आणि विश्वनाथ वामन भट रा. मोरखेड ता. दिग्रस असे गुन्हा दाखल झालेल्या तोतया कर्मचाऱ्यांचे नावे आहे. पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांचा लाभ मिळवून देतो, असे हे तिघे सांगत होते. लाभार्थ्यांकडून पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करीत होते. या तिघांनी महागाव तालुक्यातील मलकापूर, मोहदी, नागरवाडी आणि पुसद तालुक्यातील अडगाव, येलदरी यासह इतर गावातील सुमारे ५० च्यावर लाभार्थ्यांना फसविल्याचे पुढे आले. प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून त्यावर बनावट सही शिक्के मारून ते खरे असल्याचे लाभार्थ्यांना सांगत होते. मात्र अनेक अर्जांमध्ये त्रुट्या असल्याचे पत्र लाभार्थ्यांंना डाकेद्वारे आले. त्या पत्रावरील स्वाक्षरी आणि या तोतयांनी दाखविलेल्या पत्रावरील स्वाक्षरी वेगळी आढळली. त्यामुळे या तोतयांचा बनावटपणा उघडकीस आला. शेवटी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी यु.के. सकपाल यांच्यातर्फे लिपिक बाबूसिंग राठोड यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून रमेश भांगे, विलास गव्हांडे, विश्वनाथ भट यांच्याविरुद्ध ४२०, ४६७, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही. या तिघांचाही पुसदच्या प्रकल्प कार्यालयात नेहमी वावर असायचा. त्यामुळे या तिघांनी शेतकऱ्यांना प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यावर विश्वासही बसला. (तालुका प्रतिनिधी)