तहानेने व्याकूळ माकडाच्या डोक्यात अडकला गडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:12 PM2018-05-18T22:12:18+5:302018-05-18T22:12:18+5:30

पाणीटंचाईची झळ माणसालाच नाही तर पशुपक्ष्यांनाही बसत आहे. असेच तहानेने व्याकूळ झालेल्या एका माकडाच्या पिलाच्या डोक्यात गडवा अडकल्याची घटना दिग्रस येथील होलटेकपुरा परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली.

Thackenness sticks in the head of the monkey | तहानेने व्याकूळ माकडाच्या डोक्यात अडकला गडवा

तहानेने व्याकूळ माकडाच्या डोक्यात अडकला गडवा

Next
ठळक मुद्देदिग्रसची घटना : दोन तासांच्या प्रयत्नानंतर पिलाचे प्राण वाचविण्यात वन विभागाला यश

प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : पाणीटंचाईची झळ माणसालाच नाही तर पशुपक्ष्यांनाही बसत आहे. असेच तहानेने व्याकूळ झालेल्या एका माकडाच्या पिलाच्या डोक्यात गडवा अडकल्याची घटना दिग्रस येथील होलटेकपुरा परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली. डोक्यात गडवा असलेले पिलू माकडीण सोबत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत होते. वन विभागाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर माकडीणीला बेशुद्ध करून पिलाच्या डोक्यातील गडवा बाहेर काढला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सर्वच जण पाणी पाणी करीत आहे. जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्य प्राणी गावाकडे धाव घेत आहे. शुक्रवारी सकाळी माकडाचा कळप पाण्याच्या शोधात होलटेकपुरा परिसरात शिरला. शनिमंदिरासमोरील एका घरासमोर पाण्याने भरलेला स्टीलचा गडवा दिसला. या कळपातील माकडाच्या पिलाने त्यावर झडप घातली. ओनवे होऊन पाणी पित असताना त्याचे डोके आतमध्ये फसले. काय झाले हे कळलेच नाही. डोक्यात गडवा फसल्याने पिलू सैरभैर झाले. माकडीणीने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु निघालाच नाही. त्यामुळे तिने पिलाला उचलून झाडावर धाव घेतली. या झाडावरून त्या झाडावर ती उड्या मारत होती.
दरम्यान या घटनेची माहिती परिसरात होताच बघ्यांची मोठी गर्दी झाली. अशातच या घटनेची माहिती वनरक्षक संतोष बदुकले यांना झाली. त्यांनी ती माहिती वन परिक्षेत्र अधिकारी अनिल धोत्रे यांना दिली. त्यांनी तातडीने पथकासह होलटेकपुरा गाठला. दरम्यान प्राणी मित्र पंकज शुक्ला यांनाही पाचारण करण्यात आले. गडवा कसा काढावा असा प्रश्न सर्वांसमोरच पडला होता. माकडीण झालेल्या गर्दीमुळे गोंधळून गेली होती. कुणालाही जवळ येऊ देत नव्हती. झाडावरून घरावर आणि घरावरून झाडावर उड्या मारीत होती. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता.
माकडीणीला इंजेक्शनच्या सहाय्याने बेशुद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. पशु वैद्यकीय अधिकारी सूचित राठोड यांनी इंजेक्शन तयार केले आणि वनरक्षक शे. मुकबीर शे. गुलाब यांनी एअरगणच्या सहाय्याने निशाणा साधला. दोन मिनिटातच माकडीन बेशुद्ध झाली. वन विभागाने मायलेकांना जाळ्यात घेऊन वन विभागाच्या पटांगणात आणले. माकडाच्या पिलाच्या डोक्यातून गडवा काढण्यात आला. यासाठी आर्णी येथील वनरक्षक गजानन जाधव, अनिल मुजमुले, अनिल इंगोले, देवराव धनगर, घनश्याम राठोड, रामदास पद्मावार, अभय इंगळे यांनी सहकार्य केले. दोन तासानंतर माकडीण शुद्धीवर आली. त्यानंतर तिला सोडून देण्यात आले. पाण्याने व्याकूळ झालेल्या माकडावर हा प्रसंग ओढवला. वेळीच मदत झाली म्हणून माकडाच्या पिलाचे प्राण वाचले. दरम्यान या घटनेची वार्ता दिग्रस शहरात पोहोचल्यावर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बघ्यांची याठिकाणी मोर्ठी गर्दी झाली होती.

सहा वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
दिग्रस येथे माकडाच्या पिलाच्या डोक्यात गडवा अडकण्याची सहा वर्षापूर्वी घटना घडली होती. ७ एप्रिल २०१२ रोजी माकडाच्या पिलाच्या डोक्यात पाण्याच्या शोधात गडवा अडकला होता. तब्बल सहा दिवस माकडीण आपल्या गडवा अडकलेल्या पिलाला घेऊन दिग्रस शहरात भटकत होती. वन विभागाने विविध प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. अखेर सहा दिवसानंतर त्यावेळी पिलू गुदमरुन मरण पावले होते. मात्र शुक्रवारच्या घटनेत वनविभागाने तत्परता दाखवून एका पिलाची मरणाच्या दारातून सुटका केली. दिग्रसमध्ये सहा वर्षापूर्वीच्या घटनेला पुन्हा उजाळा मिळाला.

Web Title: Thackenness sticks in the head of the monkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड