ठाकरे-मोघेंची ‘डिनर डिप्लोमसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:56 PM2019-01-25T23:56:07+5:302019-01-25T23:57:01+5:30

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली.

Thackeray-Moghonchi's 'Dinner Diploma' | ठाकरे-मोघेंची ‘डिनर डिप्लोमसी’

ठाकरे-मोघेंची ‘डिनर डिप्लोमसी’

Next
ठळक मुद्देव्यूहरचना लोकसभेची : निकटवर्तीय अंधारात, पुत्रांसाठी मोर्चेबांधणी

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाची उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरेशिवाजीराव मोघे यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे एकमेकांविरोधात दंड थोपटले असतानाच अचानक त्यांच्यात ‘डिनर डिप्लोमसी’ सुरू झाली. दोघांनीही आपल्या निकटवर्तीयांना अंधारात ठेऊन जेवणाच्या टेबलवर लोकसभेच्या संभाव्य व्युहरचनेवर चर्चा केली.
मंगळवार १५ जानेवारी रोजी रात्री दत्त चौकात एका शो-रूमच्यावर असलेल्या घरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांची जेवणाच्या टेबलवर बैठक झाली. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे अधिकृत बाहेर आले नसले तरी दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांमध्ये संभाव्य अंदाज बांधले जात आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी राहुल ठाकरे काँग्रेसचे उमेदवार, त्यांना मोघेंनी मदत करावी आणि तिकडे केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघात जितेंद्र मोघे काँग्रेसचे उमेदवार, त्यांना ठाकरेंनी मदत करावी, मोघे-ठाकरे हे दोन्ही नेते राज्यातच राहून राज्यसभा व विधान परिषदेची चाचपणी करतील आदी मुद्यांवर त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मुळात माणिकराव कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढणार नाहीच असे त्यांच्या अवतीभोवती वावरणारे ‘अनुभवी’ कार्यकर्ते सातत्याने छातीठोकपणे सांगत आहेत. या कार्यकर्त्यांचीही तिच इच्छा आहे. दिल्लीत जाऊन काय मिळणार, उलट राज्यात राहिल्यास व आघाडीचे सरकार आल्यास मंत्री पदाचा विचार होऊ शकतो. कार्यकर्त्यांचा हा युक्तीवाद कदाचित माणिकरावांनाही मान्य असावा. म्हणूनच तेही लोकसभेवर जाण्यास इन्टरेस्टेड नसल्याचे सांगितले जाते. मोघेंनाही मुळात दिल्लीत इन्टरेस्ट नाही. राज्यात आदिवासी समाजातून मुख्यमंत्री बनवायचा झाल्यास ज्येष्ठ, सुशिक्षित व दीर्घ अनुभवी म्हणून आपला विचार होऊ शकतो, असे ‘स्वप्न’ त्यांना पडू लागले आहे. शिवाय मुलाचेही राजकीय पुनर्वसन करायचे आहे. त्यामुळेच मोघे-माणिकरावांच्या या ‘डिनर डिप्लोमसी’कडे राजकीयदृष्ट्या गांभीर्याने पाहिले जात आहे.
दिल्लीत भांडण, गल्लीत जेवण!
एकीकडे मुंबई-दिल्लीत पक्षश्रेष्ठींसमोर भांडायचे, कार्यकर्त्यांनाही भांडत ठेवायचे, वाईटपण घ्यायला लावायचे आणि इकडे गावात निकटवर्तीयांनासुध्दा अंधारात ठेऊन एका ताटात जेवायचे या विसंगतीमुळे दोघांच्याही समर्थकांमध्ये नाराजी आहे. इकडे मोघे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात डॉ.टी.सी. राठोड, जीवन पाटील, डॉ. मोहंमद नदीम आदी स्पर्धक इच्छुकांना सोबत घेऊन फिरतात, आमच्यातील कुणालाही उमेदवारी मिळो, आमच्यासाठी काँग्रेस पक्ष महत्वाचा आहे असे सांगतात. तर दुसरीकडे याच स्पर्धकांना विश्वासात न घेता छुप्यारितीने माणिकरावांसोबत ‘डिनर’ करतात, ही बाब मोघे समर्थक व इच्छूकांना पटलेली नाही. त्यातूनच त्यांच्या गटात त्यांच्याविरोधी वातावरण तयार होत आहे. त्यांच्या समर्थकांपैकीच काहींचा वेगळा गट त्यांच्याचविरोधात तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुत्रप्रेमापोटी दोन वैरी एकत्र
मोघे-माणिकराव एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असल्याचे चित्र कार्यकर्त्यांपुढे उभे करतात तर दुसरीकडे एकत्र बसून भविष्यातील राजकीय वाटचालीची, मुलांच्या पुनर्वसनाची गोपनीय चर्चा करतात. ही विसंगती कार्यकर्त्यांना न उमगणारी आहे. घराणेशाही व पुत्रप्रेमापोटी हे दोन नेते एकत्र आल्याचे व त्यासाठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
भाजपाच्या समर्थनार्थ काम
विशेष असे, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोघेंनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात व भाजपाच्या समर्थनार्थ काम केल्याचा सूर पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या गोटातून अजूनही आळवला जातो आहे. एवढेच नव्हे तर मोघेंनी आपल्या दुसºया एका वजनदार काँग्रेस नेत्यालासुद्धा विरोधात काम करायला लावले होते. निवडणुकीनंतर या नेत्यानेच मोघेंचा मोबाईल संदेश माणिकरावांना दाखविल्याचेही बोलले जाते.
दिल्लीत पक्षश्रेष्ठींपुढे एकमेकांविरोधात थोपटतात दंड
मोघे लोकसभा लढविण्याबाबत सिरीयस नाहीत, त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली आहे, ओपन मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला उमेदवारी कशी असा माणिकरावांचा दिल्लीतील युक्तीवाद आहे. तर माणिकराव २० वर्षांपासून निवडणूक लढले नाहीत, गेल्या निवडणुकीत त्यांनी दिलेल्या विधानसभेतील काँग्रेसच्या चार उमेदवारांना ‘एकूण’ ६७ हजार मते मिळाली, त्यांचा मुलगा चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, याच चार मतदारसंघात लोकसभेत चारच महिन्यात आपल्याला दोन लाखांवर मते मिळाली, माणिकरावांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत एकही जागा निवडून आणली नाही, त्यांच्या कार्यक्षेत्रातील एकही नगरपरिषद, बाजार समिती, पंचायत समिती काँग्रेसच्या हाती नाही हा मोघेंचा माणिकरावांविरोधातील युक्तीवाद आहे.

Web Title: Thackeray-Moghonchi's 'Dinner Diploma'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.