वणी तालुक्यात डेंग्यू आजाराचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 05:00 AM2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:27+5:30
इडिस इजिप्ती या डासाने चावा घेतल्यानंतर डेंग्यूसारख्या आजाराची बाधा होते. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यातून इडिस इजिप्ती डासांची संख्या वाढते. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचले असून, त्यातून इडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होत आहे. इडिस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार अंदाजे ५ मिलिमीटर असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नसताना वणी तालुक्यात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. सद्यस्थितीत या रुग्णांची संख्या शेकडोंच्या घरात असून, दररोज उपचारासाठी वणीतील खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. बदलत्या वातावरणामुळे तालुक्यात तापाची साथ पसरली असून, त्यातच डेंग्यूसारख्या आजाराची देखील बाधा होत आहे. त्यामुळे वणीचा आरोग्य विभाग सध्या अलर्ट मोडवर काम करताना दिसत आहे.
इडिस इजिप्ती या डासाने चावा घेतल्यानंतर डेंग्यूसारख्या आजाराची बाधा होते. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यातून इडिस इजिप्ती डासांची संख्या वाढते. गेल्या काही दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ पाण्याचे डबके साचले असून, त्यातून इडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती होत आहे. इडिस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून, त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार अंदाजे ५ मिलिमीटर असतो. हा शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास दिवसा, सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. डेंग्यू हा मादी डासांच्या चाव्याद्वारे पसरतो, असे संशोधनातून आढळले आहे. गेल्या काही दिवसांपासून वणी तालुक्यात डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. वणी तालुक्यातील भुरकी येथे एकाच दिवशी डेंग्यूचे तब्बल आठ रुग्ण आढळून आले. यासोबतच राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वांजरी येथेही काही रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. यासोबतच तालुक्यातील इतर ग्रामीण भागात देखील तापाचे रुग्ण आढळत असून, त्यापैकी अनेक जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निदान होत आहे.
कोरडा दिवस पाळण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
- इडिस इजिप्ती हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. घरातील झाडाची कुंडी, अडगळीतील टायर, कूलरची टाकी आदी इडिस इजिप्ती डासांच्या उत्पत्तीची स्थाने आहेत. त्यामुळे स्वच्छ पाणी जमा होऊ नये, यासाठी ती जागा आठवड्यातून एकदातरी कोरडी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तपासणी केल्यानंतर दररोज किमान आठ ते दहा डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात लहान बालकांचा देखील समावेश आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
डॉ. सुनील जुमनाके, बालरोगतज्ज्ञ, वणी.