ठाणेदार लागले मोक्का, एमपीडीएच्या तयारीला
By admin | Published: March 20, 2017 12:17 AM2017-03-20T00:17:08+5:302017-03-20T00:17:08+5:30
समाजासाठी घातक ठरू पाहणाऱ्या दारू विक्रेते, क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांच्याविरूद्ध मोक्का, एमपीडीए, तडीपारी यासारखी कठोर कारवाई
एसपींचे आदेश : दारू विक्रेते, गुन्हेगारांच्या रेकॉर्डची जुळवाजुळव
यवतमाळ : समाजासाठी घातक ठरू पाहणाऱ्या दारू विक्रेते, क्रियाशील गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर यांच्याविरूद्ध मोक्का, एमपीडीए, तडीपारी यासारखी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरातील ठाणेदारांनी रेकॉर्डची जुळवाजुळव चालविली आहे.
यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी सध्या नियंत्रणात दिसत असली तरी ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना, अशी हूरहूर नागरिकच नव्हे तर पोलीस दलातूनही ऐकायला मिळते आहे. भविष्यात टोळीयुद्धाला सामोरे जावे लागू नये म्हणून आत्तापासूनच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या क्राईम मिटींगमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा), एमपीडीए (झोपडपट्टीदादा कायदा) व तडीपारी यासारख्या ठोस प्रतिबंधात्मक कारवाईच्या पर्यायांचा विचार करण्याचे आदेश दिले आहे. सर्व क्रियाशील गुन्हेगारांचे क्राईम रेकॉर्ड काढा, त्यानुसार ते उपरोक्तपैकी कशात बसतात, त्यात त्यांचा प्रस्ताव तयार करा, अशा सूचना देण्यात आल्या. अवैध दारूची निर्मिती, विक्री, वाहतूक, पुरवठा यात वारंवार सहभाग सिद्ध झालेल्या व्यक्तींवर एमपीडीए लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. क्रियाशील गुन्हेगारांसाठी मोक्का व तडीपारीचा पर्याय निवडला जाणार आहे.
एसपींच्या आदेशानंतर जिल्हाभरातील ठाणेदार कामाला लागले आहेत. सर्व गुन्हेगारांची कुंडली व क्राईम रेकॉर्ड तपासले जात आहे. या गुंडांचा सध्या समाजाला कुठे त्रास आहे का, हे तपासूनच कारवाई केली जाणार आहे. दारू प्रकरणात मात्र मोठ्या प्रमाणात एमपीडीएची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: यवतमाळ शहर, वडगाव रोड, कळंब, राळेगाव, वडकी, वणी, मारेगाव, शिरपूर यासारख्या वर्धा व चंद्रपूर या दारू प्रतिबंधित जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील पोलीस ठाण्यात एमपीडीएच्या कारवाईवर अधिक भर दिला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सात ठाण्यांच्या हद्दीत क्राईम रेकॉर्डची तपासणी
पुसद, दिग्रस, उमरखेड, यवतमाळ शहर, वडगाव रोड, वणी, पांढरकवडा या ठाण्यांच्या हद्दीत मोक्काच्या दृष्टीने गुन्हेगारांच्या क्राईम रेकॉर्डची तपासणी होत आहे. एसपींच्या या मोक्का, एमपीडीए व तडीपारीच्या आदेशाची गुन्हेगारी वर्तुळातही चर्चा असून अनेक क्रियाशील गुन्हेगार व दारू निर्मिती-तस्करीमध्ये सक्रिय असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. दारू व्यवसायातील मोठे क्राईम रेकॉर्ड असलेल्या व राजकीय अभय लाभलेल्या प्रतिष्ठीतांचीही या कारवाईतून सुटका होणार नसल्याचे सांगितले जाते.