ठाणेदाराने रिव्हॉल्व्हर रोखल्याने तणाव
By admin | Published: November 29, 2015 03:03 AM2015-11-29T03:03:05+5:302015-11-29T03:08:40+5:30
युवा सेनेच्या तालुका प्रमुखावर ठाणेदाराने त्यांच्या कॅबीनमध्ये रिव्हॉल्व्हर रोखल्याने येथे तणाव निर्माण झाला होता.
आर्णीत चक्काजाम : युवा सेनेची तक्रार
आर्णी : युवा सेनेच्या तालुका प्रमुखावर ठाणेदाराने त्यांच्या कॅबीनमध्ये रिव्हॉल्व्हर रोखल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, ठाणेदारावर कारवाई करावी, या मागणीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदे हे काही कामानिमित्त दुपारी १ वाजता पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांच्यासोबत युवा सेनेचे तालुका प्रमुख नीलेश मस्के हेसुद्धा होते. या ठिकाणी मस्के यांचा मित्र नीलेश आठवले (रा.देऊरवाडी बु.) याला एका प्रकरणात ठाणेदाराने बोलावले होते. शिक्षा म्हणून त्याला दोन्ही हात वर करून एक तासापासून उभे ठेवले होते. या प्रकाराचे चित्रीकरण नीलेश मस्के हे मोबाईलमध्ये करत असल्याचा संशय ठाणेदार संजय खंदाडे यांना आला. त्यांनी चित्रीकरणाला मनाई केली. यानंतर मस्के यांच्या कानशिलावर रिव्हॉल्व्हर लावली. शिवाय मारहाणही केली. हा सर्व गंभीर प्रकार शिवसैनिक आणि युवा सेनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांपर्यंत पोहोचला. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सदर घटनेचा निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदनावर प्रवीण शिंदे, नगरसेवक प्रवीण मुनगिनवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवी राठोड, राहुल लाभशेटवार, स्वप्नील झाडे, रमेश ठाकरे, उज्ज्वल मोरे, उत्तम राठोड, लिंगाजी मंगाम, निखिल खारोळ, नीलेश गावंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात ठाणेदार संजय खंदाडे म्हणाले, चित्रीकरणास मनाई केल्यानंतरही मस्के यांनी हा प्रकार सुरूच ठेवला. आपल्यावर करण्यात आलेला मारहाण आणि रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)