ठाणेदारांना द्यावे लागणार हमीपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 05:00 AM2022-02-12T05:00:00+5:302022-02-12T05:00:12+5:30
गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णत: बंद करणे कुणालाच शक्य नाही. मात्र यावर नियंत्रण ठेवून त्याची तीव्रता कमी करता येते, असे धंदे चालविणाऱ्यांमध्ये वचक निर्माण करता येतो, सातत्याने कारवाई केल्यास अवैध धंदे चालविणारे आपली जागा बदलण्यास मजबूर होतात. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सुरुवातीपासून कठोर भूमिका घेतली आहे. त्यानंतरही अवैध धंदे सुरूच होते.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचे अवैध धंदे चालू द्यायचे नाहीत, असे आदेश पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात रूजू होताच दिले होते. त्यानुसार अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात अंकुश लागला. नंतर मात्र यात शिथिलता येत गेली व हळूहळू अवैध धंदे छुप्या पद्धतीने पुढे राजरोसपणे सुरू झाले. त्यामुळे आता धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे बंद असल्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.
गुन्हेगारी, अवैध धंदे पूर्णत: बंद करणे कुणालाच शक्य नाही. मात्र यावर नियंत्रण ठेवून त्याची तीव्रता कमी करता येते, असे धंदे चालविणाऱ्यांमध्ये वचक निर्माण करता येतो, सातत्याने कारवाई केल्यास अवैध धंदे चालविणारे आपली जागा बदलण्यास मजबूर होतात. त्यामुळेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सुरुवातीपासून कठोर भूमिका घेतली आहे. त्यानंतरही अवैध धंदे सुरूच होते. वारंवार सूचना देऊनही धंद्यांबाबत अनेक अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे मवाळ धोरण आहे. आता अवैध धंद्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी व ठाणेदारांवर निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी हमीपत्रच प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत भरवून घेतले जाणार आहे.
पूर्वी पोलीस दलात असे हमीपत्र घेण्याचा प्रघात होता. कालांतराने तो बंद झाला. आता पुन्हा याची सुरुवात केली जात आहे. ठाणेदाराने महिन्याच्या ५ तारखेपर्यंत त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेच अवैध धंदे सुरू नाहीत, असा कुठला अवैध धंद आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील, याकरिता हे हमीपत्र देत आहे, असा मजकूर या हमीपत्रामध्ये नमूद आहे. हमीपत्रामध्ये सर्व अवैध धंद्यांचा नामोल्लेख करण्यात आला आहे. ठाणेदाराकडून आलेल्या हमीपत्राची पडताळणी करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. या ठाणेदाराप्रमाणेच एसडीपीओंनाही हमीपत्र भरून द्यायचे आहे. हमीपत्रानंतरही अवैध व्यवसाय आढळून आल्यास दोघांवरही कारवाई निश्चित केली जाणार आहे. हमीपत्रामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यावर अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी निश्चित होणार आहे.
मटका, जुगार, अवैध दारू, रेती तस्करीवर नजर
- जिल्ह्यात मटका, जुगार, क्रिकेट सट्टा, चक्री, भिंगरी, सोशल क्लबच्या नावाने चालणारा जुगार, गावठी हातभट्टी दारू गाळप, त्याचा साठा, वाहतूक, विक्री, अवैधरीत्या देशी-विदेशी दारूचा साठा-विक्री, बनावट दारू उत्पादन, वाहतूक, विक्री, गुटखा निर्मिती, वाहतूक, विक्री, रेती उत्खनन, अवैध साठा, वाहतूक, जनावर तस्करी, गोमांस, गांजा उत्पादन, विक्री, वाहतूक, सेवन या सर्व अवैध प्रकार बंद करावे लागणार आहेत. यातील कुठलाही अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्यास कारवाई निश्चित केली जाणार आहे.
कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही. त्याला पाठबळ मिळत असेल तर ठोस कारवाई केली जाईल. यासाठीच प्रत्येक अधिकाऱ्याकडून हमीपत्र भरून घेण्यात येणार आहे.
- डॉ. दिलीप पाटील भुजबळ,
जिल्हा पोलीस अधीक्षक