निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 08:00 AM2022-07-01T08:00:00+5:302022-07-01T08:00:11+5:30

Yawatmal News दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे.

The agrarian economy is in crisis due to the vagaries of nature | निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

निसर्गाच्या लहरीपणाने कृषी अर्थव्यवस्था संकटात

Next
ठळक मुद्देपावसाळा एक महिने पुढे सरकला ७० टक्के पेरण्या अजूनही खोळंबल्या

रुपेश उत्तरवार

यवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. महिना लोटला तरी जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसला नाही. ज्या भागात पाऊस बरसला त्या ठिकाणी अपुरा पाऊस होता. अशा ठिकाणी दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. किमान २५ टक्के क्षेत्र यामुळे धोक्यात आले आहे. दरवर्षी निसर्गाचा प्रकोप वाढत आहे. यावर मात करणारी हवामान विभागाची यंत्रणा यावर्षी सपशेल अपयशी ठरल्याची बाब पुढे आली आहे. वारंवार वर्तविले जाणारे पावसाचे अंदाज सायंकाळपर्यंत विरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाच आर्थिक फटका बसला आहे.

गतवर्षी हवामान विभागाचा अंदाज अक्षरश: खरा ठरला, अशी स्थिती होती. एका खासगी अभ्यासकांनी वारंवार भाकीत केले. त्यांना शेतकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. याबाबत या खासगी अभ्यासकांनी काही ठोकताळे जाहीर कार्यक्रमात सांगितले. यामुळे शेतकऱ्यांचा पक्का विश्वास झाला आहे. याच अंदाजावर यावर्षी शेतकऱ्यांनी भरवसा ठेवला. शेत शिवारात पेरणी केली. प्रत्यक्षात भाकिताप्रमाणे पाऊस पडला नाही. वेधशाळेने वर्तविलेला अंदाजही दरवर्षीप्रमाणे फोल ठरला. जून महिन्यात १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात ५९ टक्केच पाऊस जिल्ह्यात कोसळला. हा पाऊस पेरणीकरिता पोषक नसल्याने या शेतशिवारात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहेत.

एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के सिंचन

मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाच्या एकूण सिंचन क्षमतेच्या १९ टक्के क्षेत्रातच प्रत्यक्षात ओलीत होत आहे. दोन लाख हेक्टर क्षमता असताना केवळ ४० हजार हेक्टर क्षेत्रावर प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन होत असल्याची संपूर्ण स्थिती आहे. यासाठी अपुरे कॅनल कारणीभूत ठरले आहे. तर अनेक ठिकाणी कॅनॉलची डागडुजी रखडली आहे.

वाढत्या महागाईपुढे पीक कर्ज अपुरे

मजुरीचे दर १०० रुपयांवरून २५० रुपयांवर पोहोचले आहेत. खताच्या किमती १२०० रुपये पोत्यावरून १५०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांचे दर ३२०० रुपयांवरून ४००० रुपयांवर पोहचले आहेत. फवारण्याच्या औषधाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे. याचवेळी मिळणारे पीक कर्ज मात्र अपुरे राहिलेे आहेत. यातून शेतकऱ्यांवर सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

Web Title: The agrarian economy is in crisis due to the vagaries of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती