स्मशानभूमीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी केला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 05:00 AM2022-02-07T05:00:00+5:302022-02-07T05:00:02+5:30

सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला.

The angry villagers blocked the road for the cemetery | स्मशानभूमीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी केला रास्ता रोको

स्मशानभूमीसाठी संतापलेल्या गावकऱ्यांनी केला रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहदा : कळंब तालुक्यातील किन्हाळा येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची स्माशनभूमी नाही. ज्यांच्याकडे स्वत:ची शेतजमीन आहे, ते स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करतात. भूमिहीनांना मात्र अडचण निर्माण होते. स्मशानभूमी तयार केली जावी, अशी मागणी वारंवार लावून धरण्यात आली. याची दखल प्रशासनाने घेतली नाही. रविवारी गावातील महिलेच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पांढरकवडा महामार्ग रोखून धरला. 
सुनंदा सखाराम राठोड (६१) या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. गावकरी व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. वारंवार विनंती करूनही प्रशासन ऐकत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यवतमाळ- पांढरकवडा मार्गावर मृतदेह घेऊन आंदोलन करण्यात आले. नेहमीच जागा मिळेल तेथे अंत्यसंस्कार करून त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. सकाळी १० वाजेपासून महामार्गावर लाकडी ओंडके, टायर जाळून रस्ता वाहतूक बंद केली. 
आंदोलनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे, उपनिरीक्षक सिडाम,  बीट जमादार शेखदार, जंगले, बोकडे, ग्रामसेवक सोनपराते, तलाठी डोळस घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या प्रश्नांचे उत्तर या कर्मचाऱ्यांकडे नव्हते. गावात ८० आर जमीन आहे. तेथे स्मशानभूमी केली जाऊ शकते हा प्रस्तावही अनेकदा देण्यात आला. मात्र,  या प्रस्तावाचा फायलीतील प्रवास काही केल्या संपला नसल्याचा आरोप करीत रोष व्यक्त केला. 

अन्‌ अधिकारी झाले निरुत्तर
- यामुळे अधिकाऱ्यांचीही दाणादाण उडाली. अखेर या प्रकरणात मध्यस्थी करण्यात आली. लवकरात लवकर स्मशानभूमी शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन देण्यात  आले, तसेच माजी मंत्री प्रा. डॉ. आमदार अशोक उईके यांनी तत्काळ दहन शेडसाठी निधी दिला. 

जिल्ह्यातील बहुतांश गावात हीच स्थिती
- ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यानंतरही बहुतांश गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. पावसाळ्यात तर अनेक बिकट परिस्थितीला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. असा जनक्षोभ इतरही ठिकाणी उठण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: The angry villagers blocked the road for the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.