‘पवित्र’ पोर्टलवर निवड झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा मुहूर्त ठरला; शनिवारपासून कागदपत्र पडताळणी
By अविनाश साबापुरे | Published: February 29, 2024 11:21 PM2024-02-29T23:21:47+5:302024-02-29T23:24:07+5:30
जिल्हा परिषदेने वेळापत्रक केले जाहीर
अविनाश साबापुरे, यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांसाठी शिक्षक म्हणून पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. जिल्हा परिषदेने या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देण्यासाठी गुरुवारी सायंकाळी वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार, शनिवारी २ मार्च, रविवारी ३ मार्च आणि सोमवारी ४ मार्च असे तीन दिवस उमदेवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. निवड यादीतील अनुक्रमांकानुसार उमेदवारांना पडताळणीसाठी दिवस निश्चित करून देण्यात आलेले आहेत. ठरलेल्या दिवशी जिल्हा परिषद सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत पडताळणी केली जाणार आहे. त्याकरिता उमेदवारांनी मूळ कागदपत्रे व त्याच्या स्वप्रमाणित केलेल्या दोन छायांकित प्रती, दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित रहावे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी कळविले आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी पवित्र पोर्टलवरून एकंदर २८२ उमेदवारांची निवड झालेली आहे. पवित्र प्रणालीवर जिल्हा परिषदेने एकंदर ३९६ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात मराठी माध्यमाची ३६८ तर उर्दू माध्यमाच्या २८ पदांचा समावेश होता. त्यापैकी, २८२ उमेदवारांची गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये मराठी माध्यमासाठी २६९ तर उर्दू माध्यमासाठी १३ उमेदवारांची निवड झाली आहे. आता या २८२ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती दिली जाणार आहे.
असे आहे पडताळणीचे वेळापत्रक
दिनांक : पोर्टलवरील उमेदवाराचा अनुक्रमांक
- २ मार्च : मराठी माध्यम १ ते ९४
- ३ मार्च : मराठी माध्यम ९५ ते १८८
- ४ मार्च : मराठी माध्यम १८९ ते २६९
- ४ मार्च : उर्दू माध्यम १ ते १३
ही कागदपत्रे ठरतील आवश्यक
- पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्राची प्रत
- शाळा, महाविद्यालय सोडल्याचा दाखला
- टेट तसेच टीईटी परीक्षेचे प्रमाणपत्र
- दहावीपासून पुढील शैक्षणिक अहर्तेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- पदवी, डीएड प्रमाणपत्र व गुणपत्रक
- जातीचे प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र, नाॅनक्रिमिलेअर प्रमाणपत्र
- समांतर आरक्षणात निवड असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
- अनाथ, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य असल्यास तसे प्रमाणपत्र
- छोटे कुटुंब असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- नावात बदल असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र
- ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड
- नियुक्तीकरिता निवड झाल्यानंतर बंधपत्र करणे बंधनकारक
मूळ कागदपत्रे सादर केल्याशिवाय व त्या कागदपत्रांची वैधता सिद्ध झाल्याशिवाय उमेदवारांची निवड केली जाणार नाही. तसेच कागदपत्रे सादर करण्यास अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. एखादा उमेदवार पडताळणीसाठी उपस्थित न राहील्यास त्याची अनुपस्थिती राज्य स्तरावर कळविण्यात येईल व पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी न चुकता वेळेत हजर राहून कागदपत्र पडताळणीची कार्यवाही करून घ्यावी.
- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ