शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावरचा हल्ला निंदनीय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:16 PM2024-10-02T18:16:42+5:302024-10-02T18:17:32+5:30
आमदारांनी खुलासा करावा : संदीप बाजोरिया यांची पत्रपरिषद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर भाजप आमदाराच्या घराजवळ चाकूहल्ला झाला. यवतमाळ शहरातील गुन्हेगारी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. आघाडीच्या कार्यकर्त्यावर चाकूहल्ला कुणी व का केला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्यासोबतच पोलिस अधीक्षकही याबाबत मौन बाळगून आहेत. आपण आमदार झाल्यास यवतमाळातील गुन्हेगारीचा बीमोड यास प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले.
यवतमाळ शहर व विधानसभा क्षेत्रात अनेक गंभीर समस्या आहेत. स्थानिक आमदारांचे कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे गाव पूर्णतः बकाल झाले आहे. चांगले अधिकारी येथे टिकू दिले जात नाही. सोयीचे अधिकारी आणून भ्रष्टाचार केला जातो. यवतमाळ नगरपालिकेत प्रशासन शिल्लक नाही. कचऱ्याचे कंत्राट घेऊन वर्षाला दहा ते बारा कोटी रुपये हडपले जात आहेत. स्वच्छता कुठेच नाही. अ दर्जाची पालिका असतानाही फॉगिंग मशीन उपलब्ध नाही. शहरात १५-१५ दिवस नळाचे पाणी येत नाही. निळोणा व चापडोह या प्रकल्पात तुडुंब पाणीसाठा आहे. तरीही नियोजन केले जात नाही. अनेक भागात रस्तेच नाहीत. सर्वत्र खड्डे तयार झाले आहेत. अशी स्थिती असतानाही ठराविक भागात मात्र सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर नवीन रस्ते बांधले जात आहेत.
यवतमाळ शहरात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे. अमृत योजना ही विषयोजना झाली आहे. यात निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले आता, भूमिगत गटारासाठी रस्ते खोदले जात आहेत. एकूणच सरकारी पैशाची लूट शहरात सुरू आहे, असा आरोप संदीप बाजोरिया यांनी केला.
आठ दिवसात प्रशासन काम कसे करणार ?
विकास निधी कित्येक वर्षे खर्च केला जात नाही. आता आचारसंहिता लागणार असताना जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे, या निधीच्या खर्चाचे आठ दिवसात नियोजन कसे करणार, हा प्रश्न आहे. डिनर सेटचे वाटप थेट कार्यकर्त्यांच्या घरून केले जात आहे. स्थानिक अधिकारी व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला.
भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग द्या
यवतमाळात सुप्रसिद्ध असा नवरात्रोत्सव साजरा होतो. राज्यातील विविध ठिकाणांवरून भाविक येथे येतात. ९ दिवस अनेकांना उपवासाचे असतात. कुणी पायात चप्पलही वापरत नाही. अशा भाविकांची वाहने शहराबाहेर उभी ठेवणे चुकीचे आहे. भाविकांच्या वाहनांना शहरात पार्किंग सुविधा द्यावी, जेणे करून त्यांना त्रास होणार नाही, अशी मागणी संदीप बाजोरिया यांनी यावेळी केली.