थकीत कर्जदारांची दोन कोटींची मालमत्ता बँकेने घेतली ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 09:07 PM2022-11-20T21:07:38+5:302022-11-20T21:10:29+5:30
बाबाजी दाते महिला बँकेच्या थकित कर्ज प्रकरणात एनपीए मर्यादेच्या बाहेर गेला. यामुळे आरबीआयने या बँकेचा बँकिंग परवानाच रद्द केला आहे. या ठिकाणच्या कामकाजाची धुरा अवसायकाकडे सोपविण्यात आली आहे. अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी थकीत कर्जदार आणि जमानतदारांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाबाजी दाते महिला बँकेच्या अवसायकांनी थकीत कर्जदारांकडून सक्तीने वसुलीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत थकबाकीदारांना दोन नोटिसा बजावल्यानंतरही त्यांनी रकमेचा भरणा केला नाही. अशा कर्जदार सदस्यांची मालमत्ता सांकेतिक ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात सहा कर्जदारांच्या दोन कोटी २० लाख रुपयांच्या मालमत्ता अवसायकांनी सांकेतिक ताब्यात घेतल्या आहे. यामुळे कर्जदारांचे धाबे दणाणले आहे.
बाबाजी दाते महिला बँकेच्या थकित कर्ज प्रकरणात एनपीए मर्यादेच्या बाहेर गेला. यामुळे आरबीआयने या बँकेचा बँकिंग परवानाच रद्द केला आहे. या ठिकाणच्या कामकाजाची धुरा अवसायकाकडे सोपविण्यात आली आहे. अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी थकीत कर्जदार आणि जमानतदारांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम हाती घेतली आहे.
बँकेकडून एक हजार १३ सभासदांनी २६७ कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यावर २०८ कोटींचे व्याज झाले आहे. यामुळे अवसायकांना ४७५ कोटी रुपयांची वसुली थकबाकीदारांकडून करायची आहे. अशा थकबाकीदार कर्जदारांना बँकेने ठरावीक कालावधीत दोन नोटीस बजावल्या आहेत. या नोटिशीला कर्जदारांनी कुठलेच उत्तर दिले नाही. यामुळे सरफेसी कायदा २००२ नुसार अवसायकांनी अशा प्रकरणात थकबाकीदार कर्जदारांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई बँकेने सुरू केली आहे. दोन नोटीसला उत्तर न दिलेल्या शहरातील सहा थकीत कर्जदारांच्या मालमत्ता बँक अवसायकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या कर्जदार सभासदांकडे दोन कोटी २० लाख ५७ हजार १८५ रुपयांची थकबाकी आहे. मालमत्ता ताब्यात घेतलेल्या ठिकाणी बँकेने संबंधित मालमत्तेसंदर्भात कर्जदार आणि गहाणतदाराशी कुठलाही व्यवहार करू नये, अशा सूचना लावल्या आहेत. आता टेंडर प्रक्रिया बोलावून लिलावाची प्रक्रिया होणार असल्याचे संकेत आहेत.
१०२६ थकबाकीदार
महिला बँकेकडून कर्ज घेणाऱ्या अनेक सभासदांनी काही मोजके हप्त भरले. त्यानंतर कर्जच भरले नाही. यातून बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला. बँक डबघाईस आली. वसुली न झाल्याने बँकेतील ठेवीदारांचे पैसेही अडचणीत आले. लिलावातून मिळणाऱ्या पैशातून ठेवीदारांच्या ठेवीच्या रकमाही परत होणार आहेत.
बँकेने थकबाकीदार सभासदांना नियमानुसार दोन नोटिसा बजावल्या आहेत. या नोटीसनंतर त्यांना अवधी दिला. यानंतरही उत्तर दिले नाही. अशा प्रकरणात सरफेसी कायदा २००२ नुसार मालमत्ता सांकेतिक ताब्यात घेतल्या जात आहेत.
- नानासाहेब चव्हाण,
अवसायक, महिला बँक
या कर्ज बुडव्यांना अवसायकाचा दणका
कर्ज वसुली व्हावी यासाठी अवसायकांनी कठोर पावले उचलणे सुरू केले आहे. ७१ लाख ५६ हजार कर्ज थकविणारे विक्रमसिंग दालवाला, आठ लाख ७१ हजार थकविणाऱ्या सोनाली बेलगमवार, मेहरबाबा एन्टरप्रायजेसच्या मंगला दोंदल, माताेश्री एजंसीचे विक्रांत कुटेमाटे, महेश माॅड्युलर किचनचे महेश कुटेमाटे, रहाणे बिल्डींग मटेरियलच्या संचालकांवर कारवाई केली.