नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह गवसले; एकाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 07:36 PM2024-03-09T19:36:09+5:302024-03-09T19:40:01+5:30
वणीच्या विठ्ठलवाडी परिसरात शोककळा
-संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : वणी-वरोरा मार्गावरील पाटाळा येथील वर्धा नदीत शुक्रवारी सायंकाळी तिघेजण बुडाल्याची घटना घडली होती. प्रशासनाने शोध मोहिम हाती घेतल्यानंतर तिघांपैकी संकेत पुंडलिक नगराळे (२७) व अनिरुद्ध सतीश चाफले (२२) या दोघांचे मृतदेह शनिवारी सकाळी हाती लागले, तर हर्षल आतिष चाफले (१६) याचा शोध सायंकाळपर्यंत लागला नव्हता.
महाशिवरात्रीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथील यात्रेसाठी अन्य काही मित्रांसह हे तिघेजण गेले होते. परतीच्या प्रवासात पाटाळा येथील वर्धा नदीवर हे सर्वजण थांबले. या तिघांपैकी एकाला नदीमध्ये पोहण्याचा माेह आवरला नाही. त्यामुळे त्याने नदीत उडी घेतली. तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागताच अनिरुद्ध व संकेतने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने तिघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेले. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत या तिघांचा नदीपात्रात शोध घेण्यात आला. मात्र शोध लागला नाही.
दरम्यान, शनिवारी नदीत बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर येथील बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. सकाळी १० वाजता हे बचाव पथक वर्धा नदीवर पोहोचले. त्यानंतर बोटीद्वारे शोध कार्यास प्रारंभ झाला. नदीपात्रात तब्बल दीड तास शोध घेतल्यानंतर सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास पाटाळा पुलापासून काही अंतरावर नदीपात्रात संकेत व अनिरुद्धचे मृतदेह या पथकाच्या हाती लागले. मात्र हर्षलचा थांगपत्ता लागला नाही. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हर्षलचा शोध लागला नव्हता. संकेत व अनिरुद्धचा मृतदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर दोघांचेही पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. या घटनेने वणीच्या विठ्ठलवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.