तीन दिवसांपूर्वी बेपत्ता युवकाचा मृतदेह लागला हाती; खुनाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 03:06 PM2023-03-11T15:06:42+5:302023-03-11T15:07:18+5:30
संशयित आरोपींवर पोलिसांचा वॉच
यवतमाळ : शहरातील रविदासनगर भागातील २५ वर्षीय युवक ८ मार्चपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. शहर पोलिसांनी या तक्रारीचा तपास सुरू केला. त्यामध्ये धक्कादायक वास्तव पुढे आले. शनिवारी सकाळी पिंपळगाव परिसरातील विहिरीत युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्या युवकाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
रोशन देवीदास बिनजोडे (२५, रा. रविदासनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो ८ मार्चच्या रात्रीपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. शेवटी रोशन कुणासोबत होता, याचा शोध घेण्यात आला. त्याचदरम्यान शनिवारी सकाळी पिंपळगाव परिसरात एका टाइल्स दुकानामागे असलेल्या विहिरीत मृतदेह आढळला. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढल्यानंतर कपड्याच्या वर्णनावरून रोशनचा असल्याचा अंदाज आला. त्याच्या नातेवाइकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी हा मृतदेह रोशनचाच असल्याचा दावा केला. अंगावरील कपडे व इतर खुणा यावरून रोशनच्या मृतदेहाची ओळख पटली.
रोशनला धारदार शस्त्राने मारहाण करून विहिरीत टाकण्यात आले, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात अद्यापपर्यंत खुनाचा गुन्हा नोंद झालेला नसला तरी घटनेमागील संशयितांची धरपकड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तो अहवाल हाती लागताच पोलिसांकडून गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे. रोशनची हत्या झाल्याचा संशय असणाऱ्यांपैकी एकाला दोन दिवसांपूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईत अटक करण्यात आली आहे. तो कारागृहात आहे, तर त्याच्या वडिलांवर व आणखी एकावर पोलिसांचा संशय आहे. गुन्ह्याचा तपास शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक जनार्दन खंडेराव व पोलिस पथक करीत आहे.