वऱ्हाडी ‘शुभमंगल सावधान’ म्हणणार... तेवढ्यात आवाज आला ‘ये शादी नही हो सकती’!

By अविनाश साबापुरे | Published: May 1, 2024 08:20 PM2024-05-01T20:20:48+5:302024-05-01T20:23:16+5:30

दोन बालविवाह ऐनवेळी उधळले : वधू-वरांसह नातेवाईकांचीही समितीपुढे पेशी.

The bridegroom will say 'Shubhmangal saavdhan'... Then a voice came out saying 'Ye shaadi nahi ho sakit'! |  वऱ्हाडी ‘शुभमंगल सावधान’ म्हणणार... तेवढ्यात आवाज आला ‘ये शादी नही हो सकती’!

 वऱ्हाडी ‘शुभमंगल सावधान’ म्हणणार... तेवढ्यात आवाज आला ‘ये शादी नही हो सकती’!

यवतमाळ : मंडप सजला, वऱ्हाडी गोळा झाले.. वरातही आली, आगतस्वागत झाले.. अंतरपाट धरला अन् हाती अक्षदा घेऊन सारे वऱ्हाडी ‘शुभमंगल सावधान’ म्हणण्याच्या बेतातच होते... पण दुसऱ्याच क्षणाला आवाज आला.. ‘थांबा थांबा.. हे लग्न नाही होऊ शकत..!’
बुधवारी हा प्रसंग एक नव्हे तर दोन लग्नांच्या मांडवात घडला अन् दोन्ही लग्न ऐनवेळी थांबविण्यात आले. कारण दोन्ही ठिकाणच्या वधू अल्पवयीन होत्या. त्यामुळे प्रशासनाला भरमांडवात शिरून ही कार्यवाही करावी लागली.  यातील एक कार्यवाही मारेगाव तालुक्यातील पहापळ तर दुसरी कार्यवाही यवतमाळ तालुक्यातील गहुली हेटी या खेड्यात करण्यात आली.

झाले असे की, जिल्हा बालसंरक्षण कक्षात बुधवारी सकाळी एका व्यक्तीने फोन केला, ‘जिल्ह्यात दोन बालविवाह दुपारी १२:०५ वाजताच्या मुहूर्तावर लागणार आहेत.’ अशी माहिती या फोनद्वारे कळविण्यात आली. ही माहिती कळताच कक्षातील यंत्रणेने लगेच दोन्ही उपवधूंच्या वयाची शहानिशा केली. दोघीही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच या दोन्ही गावांकडे तात्काळ पथके रवाना झाली. मंगलाष्टके सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी ही पथके मांडवात धडकली अन् दोन्ही बालविवाह रोखण्यात आले.
त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. मुलींच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह न करण्याबाबत सांगण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य केल्यास कायदेशीर कारवाई होऊन एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकतो, असे बजावण्यात आले. त्यानंतर मुलीला १८ वर्षे होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले. या दोन्ही अल्पवयीन मुली, त्यांचे नियोजित वर आणि लग्न लावून देणारे नातेवाईक अशा सर्वांना बाल कल्याण समितीसमक्ष हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात तातडीने ही कारवाई करण्यात आली. तर बालविवाह रोखणाऱ्या पथकाला मारेगावचे पोलीस निरीक्षक पांचाळ व लाडखेड पोलीस ठाण्याचे हिवरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. बालविवाह रोखण्याची कार्यवाही मारेगावचे बाल विकास प्रकल्प अधिकारी कळमकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, चाईल्ड हेल्पलाईन समन्वयक फाल्गुन पालकर, चाईल्ड लाईन सुपरवायझर गणेश आत्राम व दोन्ही गावातील बाल संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली. 

 आठ दिवसात दुसरी धडक कारवाई
जिल्हा बालसंरक्षण कक्षाने आठ दिवसांपूर्वीच २२ एप्रिल रोजी तब्बल पाच बालविवाह उधळून लावले. पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा गावात एकाच मांडवात आठ विवाह लावून देण्यात येत होते. त्यातील पाच उपवधू मुली अल्पवयीन असल्याची खातरजमा करून ते पाचही बालविवाह ऐनवेळी थांबविले गेले. हे प्रकरण ताजे असतानाच १ मे रोजी पुन्हा दोन बालविवाहांचा घाट उधळण्यात आला. त्यामुळे जनजागृतीनंतरही अनेक ठिकाणी बालविवाहांचा प्रयत्न सुरूच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
 
बालविवाह लावणे व त्यास सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा बालविवाहाबाबत माहिती असल्यास गावचे ग्रामसेवक, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील अथवा चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.
- देवेंद्र राजूरकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

Web Title: The bridegroom will say 'Shubhmangal saavdhan'... Then a voice came out saying 'Ye shaadi nahi ho sakit'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.