प्रसंग आहे बाका... नागरिकांना हवे पाणी, शाळेला हवे क्रीडांगण; मुख्याध्यापिकेचे उपोषण
By विलास गावंडे | Published: September 18, 2023 07:30 PM2023-09-18T19:30:35+5:302023-09-18T19:31:21+5:30
वडकीच्या शिवनगरीत निर्माण झाला पेच
वडकी (यवतमाळ) : पाणी टंचाईच्या झळा सोसत असलेल्या नागरिकांना जलकुंभ हवा आहे, तर मुख्याध्यापिकेला विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खुली जागा पाहिजे आहे. जलकुंभासाठी काम सुरू होताच मुख्याध्यापिकेने उपोषण सुरू केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. यातून वडकी (ता.राळेगाव) ग्रामपंचायत आणि प्रशासन कसा मार्ग काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वडकी येथे खैरी रोडवर असलेल्या शिवनगरीत हा प्रसंग उद्भवला आहे. शिवनगरीत भेडसावत असलेला पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. टाकीसाठी शिवनगरीतील ओपन स्पेसमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. या ले-आऊटमध्ये खासगी जागेत स्मॉल वंडर्स कॉन्व्हेंट असून या शाळेचे विद्यार्थी ओपन प्लेसमध्ये खेळतात. ले-आऊटमध्ये पाण्याच्या टाकीला या शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा सागर यांनी सुरुवातीपासून विरोध सुरू केला आहे.
चार दिवसांपासून टाकीच्या बांधकामासाठी मोजमाप करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापिका सागर यांनी काम सुरू केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला हाेता. टाकीसंदर्भात पुढे काहीही चर्चा न झाल्याने त्यांनी सोमवारपासून वडकी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ओपन प्लेसमध्ये पाण्याची टाकी व्हावी, ही नागरिकांची मागणी आहे. टाकीमुळे भविष्यात एखादी घटना घडल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, असे मुख्याध्यापिकेचे मत आहे. टाकी इतर दुसऱ्या ठिकाणी बांधावी, अशी त्यांची मागणी आहे.
शिवनगरीत पाणी समस्या असल्याने नळयोजनेसाठी नागरिकांच्या लेखी मागणीनुसार डिसेंबर २०२१ मध्ये ग्रामसभेत ओपन प्लेसमध्ये पाण्याची टाकी बांधण्याचा ठराव घेण्यात आला. यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु आता निर्माण झालेल्या प्रसंगामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे वडकी येथील ग्रामसेवक राजेंद्र ढगे यांनी सांगितले.