गणवेशाचा कापड पंचायत समितीतच पडून; शाळा सुरू होऊन महिन्याच्या वर पण गणवेश अजूनही मिळाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 06:42 PM2024-08-27T18:42:34+5:302024-08-27T19:13:45+5:30
गणवेशाविना स्वातंत्र्यदिन : राज्य शासनाच्या धोरणात दरवर्षी बदलाचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी: वणी तालुक्यात प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारे मोफत गणवेश काही विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाले नसल्याने त्यांना नव्या गणवेशाविनाच स्वातंत्र्यदिन करावा लागला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत दोन गणवेश, बूट व पायमोजे देण्याची घोषणा शासनाने केली होती. एक गणवेश स्काउट गाईडचा होता. एक नियमित, असे दोन गणवेश मिळणार होते. यातील स्काउट गाईडचे कापड एक महिन्यापासून पंचायत समितीत पडून आहे. अजूनपर्यंत ते शाळेला वाटप झाले नाही.
शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन गणवेश सक्तीचे होते. मात्र, यावर्षी शासनाने शाळांना गणवेशाचे कापड पुरविण्याचे घोषित केले. शाळा सुरू होऊन एक महिन्याच्या वर झाला. परंतु एकही तयार गणवेश शाळेत पोहोचला नाही. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे कंत्राट दारव्हा येथील एका संस्थेला दिल्याची माहिती आहे.
दुसऱ्या गणवेशाचे कापड पंचायत समिती स्तरावर पडून आहे. ते कापून प्रत्येक शाळांना देणे, त्यांनी ते नंतर बचत गटातील महिलांकडून गणवेश शिवून घेणे, अशी प्रक्रिया आहे. ते कधी मिळेल, हे सांगता येत नाही. हा गणवेश स्काऊट गाईडचा असणार आहे. बचत गटांना शिलाईसाठी ११० रुपये दिले जाणार आहेत.
एवढ्या कमी पैशात गणवेश शिवून देणे बचतगटांनाही परवडणार नसल्याने बचतगटाच्या महिलाही शालेय गणवेश शिवतील का, हा प्रश्न आहे. अधिकची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीला देऊन पालकांना हे गणवेश शिवून घ्यावे लागणार आहेत.
मागणीचा विचारच नाही
पहिली ते आठवीच्या प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दोन्ही गणवेश मोफत देण्याची योजना आहे. मुलांना आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची हाफ वा फूल पँट, तर मुलींना आकाशी रंगाचा टॉप व गडद या रंगाचा स्कर्ट असा गणवेश आहे. पाचवी ते आठवीच्या मुलींना टॉप व स्कर्ट नको. त्यांना त्याच रंगाचा सलवार कमीज असा गणवेश द्यावा, अशी मागणी शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाकडे केली आहे. मात्र या मागणीचा शालेय शिक्षण विभागाने अद्यापही विचार केला नसल्याचे दिसून येत आहे.
"नियमित गणवेश शाळांना अजून दिले नाहीत. कारण ते अजूनपर्यंत मिळालेच नाही. दुसऱ्या स्काऊट गणवेशाचे कापड वाटप केले जाईल."
- स्नेहदीप काटकर, गटशिक्षणाधिकारी, वणी