अधिवेशन ताेंडावर आले, दवाखान्यात सगळे आलबेल ठेवा
By अविनाश साबापुरे | Published: November 21, 2023 06:42 AM2023-11-21T06:42:28+5:302023-11-21T06:42:58+5:30
आरोग्य खात्याला धसका : संपाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट
अविनाश साबापुरे
यवतमाळ : रुग्णालयातील अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची कमतरता अन् त्यातच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप... अशा पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन तोंडावर आले आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्याने धसका घेतला असून, सर्व शहरी, ग्रामीण रुग्णालयांना हाय अलर्ट पाठविण्यात आला आहे.
अधिवेशनापूर्वी लोकप्रतिनिधी, पत्रकार दवाखान्यांना भेटी देतील, त्यामुळे दवाखान्यात सारे काही आलबेल दाखवा, असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी दिले आहेत. येत्या ७ डिसेंबरला नागपुरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी राज्यातील खासदार, आमदार, त्यांचे कार्यकर्ते आरोग्य संस्थांना भेटी देतात. आढळलेल्या त्रुटींवर अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करतात. यंदा कोणत्याही त्रुटी आढळू नयेत, यासाठी सावधगिरी बाळगावी, असे आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
हे आहेत अलर्ट
nआरोग्य संस्था पूर्ण वेळ सुरू ठेवा.
nसर्व अधिकारी, कर्मचारी पूर्ण वेळ उपस्थित ठेवा.
nमुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर महामार्गावरील आरोग्य संस्थांना हाय अलर्टवर ठेवा.
nरुग्णालयात सर्व औषधे उपलब्ध ठेवा, रेकाॅर्ड अद्ययावत ठेवा.
nमुदतबाह्य औषधांची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी.
nप्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृहात, वाॅर्डात २४ तास पाणी उपलब्ध ठेवा.
आरोग्य अभियानातील सर्व कर्मचारी २५ ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन करीत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांची ४५ टक्के पदे रिक्त आहेत. कर्मचारी नसतानाही कामकाज केवळ कागदोपत्री होते का, हा संशोधनाचा विषय आहे.
- अशोक जयसिंगपुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना