बॅन्ड वाजविण्याचा वाद, झटापटीत गेला युवकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 04:03 PM2022-11-08T16:03:32+5:302022-11-08T16:04:08+5:30
मानकेश्वर येथील घटना; तरुणाच्या मृत्यू प्रकरणात न्यायवैधकच्या अभिप्रायाची प्रतीक्षा
उमरखेड (यवतमाळ) : तालुक्यातील माणकेश्वर येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तुळशीचे लग्न लावत असताना बैंड वाजविण्यावरून वाद झाला. वादानंतर झालेल्या हाणामारी व झटापटीत एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीस प्रशासन न्यायवैधक शास्त्राच्या अभिप्रायाची प्रतीक्षा करीत आहे नंतरच पुढील कार्यवाही करणार आहे.
बाबाराव मोतिराम पतंगे (२७) पंकज असे मृत युवकाचे नाव आहे. बाबारावच्या घरासमोर लक्ष्मण (परमेश्वर गाजलवार (30) हा युवक डफडे वाजवीत होता. त्याला बाबाराव यांनी डफडे वाजवू नको असे समजातून सांगितले. त्यामुळे संतापलेल्या लक्ष्मणने हाणामारी केली. यावेळी झालेल्या झटापटीत बाबाराव पतंगे यांना गंभीर दुखापत आली. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले होते.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांनी रुग्णालयात भेट दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अतुलकर, बिटरगावचे ठाणेदार प्रताप बोस उपस्थित होते. मृत्यूचे नेमके कारण, उत्तरीय तपासणी अहवालानंतरच कळणार आहे. त्यामुळे पोलिसांना न्यायवैधक शास्त्राच्या उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतस्व पोलीस प्रशासन पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.
क्षुल्लक कारणातून एका युवकाचा या घटनेत बळी गेला. केवळ घरासमोर बॅन्ड वाजविण्याचे कारण त्यासाठी कारणीभूत ठरले. लक्ष्मणने शिवीगाळ केल्यामुळे मृत बाबाराव याचाही पारा भडकला. यातूनच वादावादी झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी दोघांमध्येही झटापट झाली. या झटापटीतच बाबारावच्या नाजूक अंगाला गंभीर दुखापत झाली होती. मारहाणीनंतर बाबाराव व्हिवळत असतानाच त्याला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. त्यानंतर उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मानकेश्वर येथील युवक बाबाराव मोतीराम पतंगे यांच्या मृत्यू प्रकरणात न्यायवेद्यक शस्त्राचा अभिप्राय येणे बाकी आहे. अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- प्रताप बोस, ठाणेदार, बिटरगाव