...तर तीन महिन्यांनी आम्ही पुन्हा येवू; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा
By रूपेश उत्तरवार | Published: March 21, 2023 07:31 PM2023-03-21T19:31:28+5:302023-03-21T19:31:34+5:30
समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा कर्मचाऱ्यांचा सरकारला दिला आहे.
यवतमाळ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्यस्तरावर हा संप मागे घेतल्याची घोषणा झाली; परंतु ज्या मुद्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, त्याचे ठोस उत्तर मिळाले नसल्याचे सांगत मंगळवारीही येथील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. दुपारनंतर मात्र संप मागे घेण्यात आला. तीन महिने सरकारच्या निर्णयाची वाट पाहू, सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनासाठी येवू असा इशारा समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी दिला. त्यानंतर कर्मचारी कामावर परतले.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम होते. सात दिवसांपासून सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते; परंतु मुंबईमध्ये समन्वय समितीचे विश्वास ताटकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची भूमिका जाहीर केली. यामुळे जिल्हास्तरावरील आंदाेलन मंगळवारी परत घेण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळच्या आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांची सभा झाली. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांनी आंदोलन परत घेतल्याबाबत राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्ती केली.
स्थानिक पातळीवर कुणाला विश्वासात न घेता आंदोलन मागे घेतल्या गेल्याचा आरोप समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. रवींद्र देशमुख यांनी यावेळी केला. नियुक्त केलेल्या समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदू बुटे, नदीम पटेल, मधुकर काठोळे, किशोर पाेहणकर, आशिष जयसिंगपुरे, प्रवीण बहादे, संतोष राऊत, अरविंद देशमुख, सतीश काळे, संजय यवतकर, मंगेश वैद्य, पुरुषोत्तम ठोकळ, नीरज डफळे, भुमन्ना बोमकंटीवार, विजय बुटके यांनी केले. आंदोलनात सरकारी, निमसकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
आंदोलनस्थळी ३०० कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी येथील आझाद मैदानावर आठ दिवस आंदोलन केले. दरम्यान आंदोलनस्थळी समन्वय समितीच्या वतीने रक्तदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ३०० कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यामुळे गरजवंत रुग्णांना उपचार करताना मोलाचा आधार लागण्यास मदत होणार आहे.