बडतर्फ कर्मचारी कामावर परतू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 05:00 AM2022-04-07T05:00:00+5:302022-04-07T05:00:14+5:30
आठवडाभरापूर्वी केवळ १२५ बसेसद्वारे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक केली जात होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७६ बसेसच्या माध्यमातून ४४२ फेऱ्या करण्यात आल्या. १२ हजार २८८ नागरिकांनी लोकवाहिनीतून प्रवास केला. आता आणखी कर्मचारी वाढले असल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढण्यासोबतच प्रवाशांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संपात सहभागी झाल्याने बडतर्फीच्या कारवाईत अडकलेले कामगार कामावर हजर होण्याची गती एकदम वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत ३८ कर्मचारी कामावर हजर झाले. केवळ सक्त ताकीद देऊन त्यांना कामावर घेण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक वाहक आणि चालकांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील पाच महिन्यांपासून संप सुरू केला आहे. दरम्यानच्या काळात महामंडळाने या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. शिवाय, कारवाईचा बडगाही उगारण्यात आला.
यवतमाळ विभागातील ४१७ कामगारांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यातील काही कर्मचाऱ्यांनी अपील केल्यानंतर त्यांना सक्त ताकीद देऊन कामावर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ४ व ५ मार्च या दोन दिवसांत अनुक्रमे २०, १८ कर्मचाऱ्यांना कामावर घेतले गेले.
१७६ एसटी बसेसने प्रवाशांची वाहतूक
- चालक, वाहक कामावर येण्याची संख्या जसजशी वाढत आहे, तसतशी बसफेऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. आठवडाभरापूर्वी केवळ १२५ बसेसद्वारे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक केली जात होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७६ बसेसच्या माध्यमातून ४४२ फेऱ्या करण्यात आल्या. १२ हजार २८८ नागरिकांनी लोकवाहिनीतून प्रवास केला. आता आणखी कर्मचारी वाढले असल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढण्यासोबतच प्रवाशांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रामीण फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणार
बडतर्फीची शिक्षा बाजूला सारून केवळ सक्त ताकीद देऊन कामावर घेण्यात आलेल्या ३८ कर्मचाऱ्यांची कामगिरीवर रुजू होण्यापूर्वी मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात पात्र झाल्यानंतरच त्यांना कामावर घेतले जाणार आहे. शिवाय, एक दिवसाचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाईल.
१७ वाहकांच्या हाती येणार तिकीट मशीन
दोन दिवसांत कामगिरीवर येण्यास तयार झालेल्या कामगारांमध्ये सर्वाधिक १७ वाहक आहेत. आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतर त्यांना कामावर रुजू करून घेतले जाईल. लगेच त्यांच्या हाती तिकिटांचे मशीन दिले जाईल. रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन चालक तथा वाहकाचा समावेश आहे.