जन्मदात्यानेच सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकला, क्रूरकर्मा बापाचे कृत्य

By सुरेंद्र राऊत | Published: November 14, 2023 08:34 PM2023-11-14T20:34:57+5:302023-11-14T20:35:22+5:30

चित्रपटातील कथानकातून भय वाढविण्यासाठी रेखाटली जाणारी क्रूरता वास्तवात घडली तर काय होते, याचा प्रत्यय रांजणगाव येथील सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या हत्येतून आला.

The father himself strangled the six month old baby and threw the body into the well the act of a cruel father | जन्मदात्यानेच सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकला, क्रूरकर्मा बापाचे कृत्य

जन्मदात्यानेच सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकला, क्रूरकर्मा बापाचे कृत्य

 आर्णी (यवतमाळ) : चित्रपटातील कथानकातून भय वाढविण्यासाठी रेखाटली जाणारी क्रूरता वास्तवात घडली तर काय होते, याचा प्रत्यय रांजणगाव (जि. पुणे) येथील  सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या हत्येतून आला. बदनामीच्या भीतीतून कुमारीमातेला धमकावत जन्मदात्यानेच सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून मृतदेह विहिरीत फेकला. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवत रांजणगाव एमआयडीसी पोलिस थेट आर्णी तालुक्यातील सेवादासनगर येथे पोहोचले. क्रूरकर्मा पित्यासह बाळाची आई व आजी या तिघांना ताब्यात घेतले. 

संदीप बळीराम राठोड (२१) रा. सेवादासनगर आर्णी असे आरोपीचे नाव आहे. संदीप हा रोजगाराच्या शाेधात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे पोहोचला. तेथे त्याला कामधंदा मिळाला. संदीपचे त्याच्या मोठ्या भावाच्या साळीसोबतच प्रेमसंबंध होते. ती अल्पवयीन असल्याने तिला घेऊन तो रांजणगाव येथे राहू लागला. दोघांचे लग्न झाले नाही, एकत्र नांदत असतानाच त्यांना मुल झाले. मुलगा पाहता पाहता सहा महिन्यांचा झाला. मात्र गावी परत जायचे कसे याची चिंता संदीपला सतावू लागली. लग्न न करताच प्रेयसी आई बनली याबाबत त्याला भीती वाटू लागली. यातूनच त्याने स्वत:च्या सहा महिन्यांच्या बाळाचा गळा घोटून खून केला. मृतदेह विहिरीत फेकून दिला व तेथून प्रेयसीला घेऊन आपल्या मूळगावी सेवादासनगर, ता. आर्णी, जि. यवतमाळ येथे पोहोचला. 

रांजणगाव येथे ९ नोव्हेंबरला एका विहिरीत बाळाचा  मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढून त्याची शवचिकित्सा केली. या अहवालातून बाळाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले. अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. सहा महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्या मातांची माहिती गोळा केली. नंतर त्या प्रत्येक पत्त्यावर जाऊन बाळ आहे की नाही, याची खातरजमा केली. हे शोधकार्य सुरू असतानाच १३ नोव्हेंबर रोजी पोलिसांना यश आले. संदीप व त्याची प्रेयसी ज्या ठिकाणी  किरायाचे घर घेऊन राहत होते, तेथे पोलिस पोहोचले. तेथून संदीपबद्दलची माहिती मिळाली. रांजणगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांना घटनेची माहिती दिली. ठाकरे यांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी संदीप राठोड, त्याची प्रेयसी व आई यांना ताब्यात घेतले. रांजणगाव पोलिसांचे पथक आर्णीत पोहोचले. त्यांनी तिघांंनाही ताब्यात घेतले आहे. 

आरोपी म्हणतो, बाळ आजारी राहत असल्याने संपविले

आर्णी पोलिसांनी क्रूरकर्मा संदीप बळीराम राठोड याला ताब्यात घेतले. रांजणगाव पोलिस येईपर्यंत विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल करीत बाळ आजारी राहत होते, म्हणून त्याला संपविले, असे कारण दिले. 

आरोपी खोटा बोलतोय हे रांजणगाव पोलिस येताच उघड झाले. बाळ आजारी असल्यामुळे त्याला संपविले असे आरोपी सांगतो. प्रत्यक्षात मात्र सहा महिन्यात एकदाही बाळावर रुग्णालयात उपचार केल्याची नोंद किंवा माहिती नाही. यावरून केवळ बदनामीच्या भीतीतून किंवा आपले दुष्कर्म लपविण्यासाठी चिमुकल्याचा जीव घेतला गेला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. हे कृत्य घडत असताना त्या बाळाची आई, त्याची आजी का गप्प होती, याचाही शोध आता रांजणगाव पोलिस घेत आहेत.

Web Title: The father himself strangled the six month old baby and threw the body into the well the act of a cruel father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.