जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आर्थिक घोटाळा पोहोचला दहा कोटींवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 06:36 PM2024-08-31T18:36:14+5:302024-08-31T18:37:27+5:30
जांबबाजार गैरकारभाराची भर : आजवर २३ कर्मचाऱ्यांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भ्रष्टाचारामुळे सतत चर्चेत राहात असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मागील तीन वर्षांतील आर्थिक घोटाळा दहा कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिन्यात चौकशी झालेल्या जांबबाजार शाखेतील घोटाळ्याने यात ४० लाख रुपयांनी भर पडली आहे. या शाखेचा घोटाळा आता एक कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घोटाळा प्रकरणात आतापर्यंत या बँकेच्या २३ कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फी यासारखी कारवाई झाली आहे.
संशयास्पद आर्थिक बाबी आढळलेल्या जिल्हा बँकेच्या शाखांची चौकशी केली जात आहे. यामध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा पुढे येत आहे. मागील तीन वर्षांत उघड झालेल्या घोटाळ्यात सर्वांत आघाडीवर आर्णी शाखा आहे. या शाखेमध्ये तब्बल चार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आढळून आला आहे. त्या खालोखाल दिग्रस शाखेमध्ये दोन कोटी ८५ लाख, दिग्रस शहर शाखेत नऊ लाख, कलगावमध्ये ५० लाख, तर हिवरा संगम शाखेमध्ये एक कोटी ८७ लाख रुपयांचा घोटाळा आढळून आला आहे.
महिनाभरापूर्वी जांबबाजार शाखेची चौकशी करण्यात आली. आतापर्यंत झालेल्या चौकशीत ४० लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. हा आकडा एक कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आर्थिक घोटाळ्यामध्ये बँकेच्या काही संचालकांचेही हात गुंतले असल्याचे सांगितले जाते. या सर्व प्रकरणात आतापर्यंत २३ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील पाच कंत्राटी कर्मचारी बडतर्फ झाले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण ९४ शाखा आहेत. संशयास्पद व्यवहार दिसत असलेल्या शाखांचे निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लेखा परीक्षण केले जात आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसात तक्रार केली जाते. आतापर्यंत गैरप्रकार आढळलेल्या हिवरा, दिग्रस, आर्णी येथील शाखेच्या कर्मचाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी आलेली रक्कम त्यांच्या खात्यात न टाकता इतरांच्या खात्यात वळती केली. शिवाय, सस्पेंन्स खाते वापरून रक्कम हडपली जाते. असाच प्रकार करून बँकेच्या एका माजी संचालकाचे कर्ज खाते नील केल्याची बाब जांबबाजार शाखेतून पुढे आली आहे.
जांबबाजार शाखेत असा झाला घोटाळा
एरंडा संस्थेची बँक वसुली १२ लाख ५२ हजार ८०० रुपये बँक निरीक्षकांनी सस्पेंन्स खात्यात जमा दाखविले. यातील सहा लाख १२ हजार ६४६ रुपये सोसायटी कर्ज खात्यात जमा दर्शविले. दोन लाख ८४ हजार ७८६ रुपये एका चारचाकी वाहन कर्ज खात्यात तर दोन लाख ६० हजार ४०० रुपये दुसऱ्या एका कर्ज खात्यात जमा दर्शविले आहे. यातील एक खाते माजी बँक संचालकाचे आहे. बँकेचे पैसे भरून या संचालकाचे खाते नील करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या प्रकरणात शाखा व्यवस्थापक पी. ए. राठोड, कंत्राटी लिपिक अरविंद चव्हाण, शाखा निरीक्षक डी. डी. पवार यांना जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यावर २५ लाख ५४ हजार ७४४ रुपये वसूल रक्कम निश्चित केली आहे. प्रथम तपासणीत गैरव्यवहाराची एकूण रक्कम ३४ लाख ४१ हजार ६३० रुपये निश्चित झाली आहे. दरम्यान, शाखा व्यवस्थापक पी. ए. राठोड, शाखा निरीक्षक डी. डी. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
दोन कोटी रुपये वसूल
आतापर्यंत घोटाळा उघड झालेल्या रकमेतील दोन कोटी रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. गुन्हा कबूल करून त्यांनी रकमेचा भरणा केला आहे. परंतु आता उर्वरित रकमेचे काय, हा प्रश्न कायम आहे.
"जांबबाजार शाखेची चौकशी सुरू करण्यात आली. त्यात आर्थिक घोटाळा आढळून आला. पूर्ण चौकशीअंती या शाखेतील घोटाळ्याची अंतिम स्थिती स्पष्ट होईल. बँकेच्या सर्वच शाखेची चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाईल."
- मनीष पाटील, अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक