नीट परीक्षेत डमी उमेदवार बसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सातजण गजाआड

By विशाल सोनटक्के | Published: October 5, 2023 05:51 PM2023-10-05T17:51:20+5:302023-10-05T17:54:28+5:30

राजस्थानातील तिघांसह नांदेडमधील दोघे, तर झारखंड, पालघरमधील एकाला अटक

The gang that planted dummy candidates in NEET exam was finally exposed; Seven people were arrested | नीट परीक्षेत डमी उमेदवार बसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सातजण गजाआड

नीट परीक्षेत डमी उमेदवार बसविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सातजण गजाआड

googlenewsNext

यवतमाळ : वैद्यकीय शिक्षणाकरिता घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेकरिता जागोजागी डमी उमेदवार बसवून आंतरराज्यीय रॅकेट चालविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून, या टोळीतील सातजणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये राजस्थान येथील तिघा जणांसह झारखंड येथील व पालघर येथील प्रत्येकी एकाचा समावेश असून, दोघेजण नांदेड येथील आहेत. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

येथील धामणगाव रोडवरील एका इंग्लिश स्कूलचे लिपिक कार्तिक सुभाष कऱ्हे यांनी ७ मे २०२३ रोजी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ७ मे रोजी त्यांच्या शाळेवर एनटीए दिल्लीमार्फत नीटची परीक्षा होणार होती. त्याकरिता एनटीए दिल्ली यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन व चेहरा पडताळणी करणाऱ्या इनोव्हेटिव्ह प्रा.लि.चे प्रमुख पवन रमेश डोंगरे यांच्याकडून उमेदवारांची ओळख पटविण्यात आली.

ओळख पटविण्याचे झाल्यानंतर ही माहिती एनटीए दिल्लीला पाठविण्यात आली. यावर उमेदवार आकार चंद्रकांत पाटील (रा. कोपरी, जि. पालघर) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाची फेरतपासणी करण्याच्या सूचना आल्या. त्यानुसार पुन्हा तपासणी केली असता, वरील दोन उमेदवारांच्या नावावर जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी (२२, रा. घुगल, बिकानेर, पो. नया शहर ठाणा, राजस्थान) आणि महावीर सिखरचंद नाई (रा. गया शहर, पाबू चौक बिकानेर, राजस्थान) या दोघांनी परीक्षा दिल्याचा प्रकार पुढे आला. त्यामुळे बनावट प्रवेशपत्र तसेच बनावट आधार कार्ड तयार करून त्याद्वारे नीटची परीक्षा देऊन शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद देण्यात आली. त्यावरून यवतमाळ शहर पोलिस ठाण्यामध्ये कलम ४०६, ४१७, ४२०, ४६५, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केला. गुन्हे शाखेने डमी उमेदवार जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी व महावीर सिखरचंद नाई या राजस्थानातील दोघांना अटक केली. या दोघांकडून सविस्तर विचारपूस केली जात होती. त्यानंतर गुन्ह्यातील इतर आरोपींची नावेही पुढे आली. त्यानुसार आकार चंद्रकांत पाटील (रा. कोपरी, जि. पालघर), गजानन मधुकर मोरे (३६, रा. नांदेड), नागनाथ गोविंद दहीफळे (४२, रा. नांदेड) राजीव रामपदारथलाल कर्ण (४४, रा. झारखंड), नरेश बलदेवराम बिष्णोई (२२, रा. जोधपूर, राजस्थान) या पाचजणांना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सपोनि अमोल मुडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतीश फुके आदींनी सायबर सेलच्या सहकार्याने पार पाडली.

आरोपीवर दिल्लीमध्येही याच पद्धतीचा गुन्हा

यवतमाळ पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी जितेंद्र गाठचौधरी, महावीर नाई, नरेश बलदेवराम बिष्णोई हे तिघेही दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षणक्रमाचे विद्यार्थी आहेत, तर गजानन मधुकर मोरे व नागनाथ गोविंद दहीफळे हे दोघे नांदेड येथे नीट परीक्षेकरिता घेण्यात येणाऱ्या खासगी वर्गाशी संबंधित आहेत. हे सर्वजण नीट परीक्षेकरिता डमी उमेदवार बसवून आंतरराज्यीय रॅकेट चालवित असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, यातील नरेश बिष्णोई याच्यावर याच पद्धतीचा गुन्हा दिल्ली येथेही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The gang that planted dummy candidates in NEET exam was finally exposed; Seven people were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.