मुलीचा फोन आला अन् फसला! हनी ट्रॅपमध्ये अडकवून १४ हजाराने गंडविले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
By विलास गावंडे | Published: December 29, 2023 05:35 PM2023-12-29T17:35:36+5:302023-12-29T17:36:28+5:30
नेर येथील एका युवकाच्या व्हॉट्सॲपवर एका अनाथ आश्रमातील मुली लग्नाच्या आहेत, जातीची आणि वयाची अडचन नाही अशी पोस्ट आली.
नेर (यवतमाळ) : हनी ट्रॅपमध्ये अडकवून युवकाला १४ हजार रुपयाने गंडविल्याचा प्रकार नेर तालुक्यात उघडकीस आला. मुलीचा सुंदर फोटो पाहून फसगत झालेल्या युवकाने नेर पोलिसात तक्रार केली.
नेर येथील एका युवकाच्या व्हॉट्सॲपवर एका अनाथ आश्रमातील मुली लग्नाच्या आहेत, जातीची आणि वयाची अडचन नाही अशी पोस्ट आली. युवकाने दिलेल्या नंबरवर संपर्क केला. त्यावेळी त्याच्याशी एक मुलगी बोलली. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर युवतीचा सुंदर फोटो या मुलाच्या व्हॉटस्ॲपवर टाकला. यूवकाने आपल्याला मुलगी पंसत असल्याचे सांगितले.
युवकासोबत बोललेल्या मुलीने रजीस्ट्रेशन करण्यासाठी लग्नाचा खर्च म्हणून १४ हजार रुपये आँनलाईन टाकण्यास सांगितले. यासाठी क्यूआर पाठवला. यूवकाने लगेच क्यूआरवर १४ हजार रुपये पाठवले. क्यूआर कोड असलेले अकाऊंट महिलेच्याच नावावर होते. लगेच क्यूआर कोड डिलिटही करण्यात आला. यानंतर युवतीने फोन उचलनेच बंद करून टाकले.
आपली फसवणूक झाल्याचे या युवकाला लक्षात आले. या घटनेची तक्रार त्याने नेर पोलिसात केली. पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे. विविध प्रकारची आमिषे दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. हनी ट्रॅपपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे, असे नेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब नाईक यांनी सांगितले.