पालकमंत्र्यांनीच सोडले शिवसेनेचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 05:00 AM2022-06-22T05:00:00+5:302022-06-22T05:00:20+5:30

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेते संदीपान भूमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. पैठनमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेले भूमरे हे तब्बल पाच वेळा शिवसेनेकडून आमदार झालेले आहेत. त्यांच्याकडे फलोत्पादन मंत्रिपदासह यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आहे.

The Guardian Minister left the Shiv Sena ground | पालकमंत्र्यांनीच सोडले शिवसेनेचे मैदान

पालकमंत्र्यांनीच सोडले शिवसेनेचे मैदान

Next

विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीनंतर मंगळवारची पहाट राजकीय भूकंप घेऊन उगविली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे मुक्कामी गेले. यामध्ये यवतमाळचे विद्यमान पालकमंत्री संदीपान भूमरे यांचेही नाव आहे. तर यवतमाळमधूनच काही वर्षापूर्वी विधान परिषद लढविलेले तानाजी सावंतही सुरतमध्येच आहेत. सेनेतील या बंडाळीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांना धक्का बसला असून,  जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबईतील घडामोडींकडे लागले आहे. 
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना नेते संदीपान भूमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. पैठनमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास केलेले भूमरे हे तब्बल पाच वेळा शिवसेनेकडून आमदार झालेले आहेत. त्यांच्याकडे फलोत्पादन मंत्रिपदासह यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे भूमरे हेही सुरतमध्ये असल्याचे पुढे आल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांत अस्वस्थता पसरली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रारंभी भूमरे यांना राज्यमंत्री करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याच रात्री त्यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत असल्याचा निरोप दिला. यावर स्वत: भूमरे यांनी कॅबिनेट नको, राज्यमंत्रीच ठेवा अशी विनंती केली होती. मग भूमरे यांनी सेनेला आता हात का दिला, असा प्रश्न शिवसैनिकांना सतावतो आहे. 
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्यांमध्ये यवतमाळ विधान परिषदेतून सहा वर्षांपूर्वी आमदार झालेल्या तानाजी सावंत यांचेही नाव आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये यवतमाळ विधान परिषद मतदारसंघातून ३४८ मते घेऊन तानाजी सावंत हे विजयी झाले होते. त्यांनी कॉंग्रेस उमेदवार शंकर बढे यांचा २७० मतांनी पराभव केला होता. शिक्षण आणि साखर सम्राट अशी ओळख असलेल्या सावंत यांनी विधानसभा निवडणुकीवेळी यवतमाळ विधान परिषदेचा राजीनामा दिला आणि ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. सेना-भाजप सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद होते. मात्र, महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर त्यांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे ते नाराज होते. त्यांना मानणारा काही शिवसैनिकांचा वर्ग यवतमाळमध्ये आहे. मंगळवारी तरी कोण गेले, कोण राहिले याचीच चर्चा दिवसभर सुरू होती. 
दरम्यान, भाजपच्या वर्तुळात मात्र उत्साह पसरला आहे.  मी पुन्हा येईन ही घोषणा प्रत्यक्षात येण्याच्या आशा भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाढल्या आहेत. 

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे ‘वेट ॲण्ड वाॅच’
- मंगळवारी शिवसेना आमदारांच्या बंडाळीने शिवसैनिकात अस्वस्थता पसरली. कोण गेले आणि कोण सोबत आहेत, पुढे काय होणार, याचीच दिवसभर चर्चा सुरू होती. काही आमदारांसह विद्यमान मंत्र्यांची नावे टीव्हीवर झळकत असल्याने शिवसैनिकांची अस्वस्थता वाढताना दिसली. तरीही या संकटातूनही शिवसेना बाहेर पडेल, असे निष्ठावंत सैनिकांना वाटते पदाधिकारी मात्र ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत दिसले. 

संजय राठोड यांची शिवसेनेच्या बैठकीला उपस्थिती 
- माजी पालकमंत्री तथा दारव्हा-दिग्रसचे आमदार संजय राठोड हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेल्याच्या बातम्या मंगळवारी सकाळी वृत्तवाहिन्यातून झळकत होत्या. मात्र, दुपारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला आमदार संजय राठोड यांची उपस्थिती होती. संजय राठोड हे मुंबईतच असून सेनेसोबत असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत प्रतिक्रियेसाठी त्यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान मुंबईतील पुढील    घडामोडीकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: The Guardian Minister left the Shiv Sena ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.