दोघांचा बळी घेणारी 'ती' नरभक्षक वाघिण अखेर जेरबंद; नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 04:31 PM2022-12-07T16:31:16+5:302022-12-07T16:48:16+5:30
वणी तालुक्यातील कोलारपिंपरीलगतच्या सबस्टेशन परिसरात केले जेरबंद
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : गेले अनेक दिवस वणी परिसरात सातत्याने धुमाकूळ घालून दोघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले. बुधवारी सकाळी ११ वाजता वणी तालुक्यातील कोलारपिंपरीलगतच्या सबस्टेशन परिसरातील शिवारात या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्यात आले. त्यानंतर तिला गोरेवाडा (नागपूर) येथील वाईल्ड रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
मागील काही दिवसांपासून वणी तालुक्यात या वाघिणीने उच्छाद मांडला होता. १० नोव्हेंबरच्या सायंकाळी रांगणा भुरकी शिवारात अभय मोहन देऊळकर या वर्षीय तरूणावर हल्ला करून त्याला या वाघिणीने ठार मारले होते. या घटने पाठोपाठ २४ नोव्हेंबरला हिच वाघिण ब्राह्मणी परिसरात शिरली. पहाटे ५ वाजताच्या सुमारास या वाघिणीने टॉवरवर काम करणाऱ्या उमेश पासवान (३५) या परप्रांतिय मजुरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. ही घटना ताजीच असताना कोलारपिंपरी परिसरात वाघिणीचा धुमाकूळ सुरू झाला. २७ नोव्हेंबर रोजी कोलारपिंपरी येथील रामदास पिदूरकर या ५८ वर्षीय गुराख्यावर हल्ला करून या वाघिणीने त्याला ठार केले. सततच्या या व्याघ्र हल्ल्यामुळे वणी परिसरात प्रचंड दहशत पसरली होती.
आठवडाभरापासून वॉच
कोलारपिंपरी परिसरात गुराख्याला ठार केल्याच्या घटनेनंतर वनविभाग अलर्टमोडवर आला. जेरबंद करण्याचे आदेश प्राप्त होताच, गेल्या आठवडाभरापासून या नरभक्षी वाघिणीच्या हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून होता. तिला बेशुद्ध करण्यासाठी पुसद येथील वनविभागाचे खास पथक वणीत दाखल झाले होते.
वाघिणीला ट्रॅन्क्युलाईज करण्याचा प्रयत्न दोनदा फसला. मात्र बुधवारी सकाळी ही नरभक्षी वाघिण वनविभागाच्या टप्प्यात आली आणि तिला बेशुद्ध करून पकडण्यात यश आले. यामुळे तुर्तास नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पडकण्यात आल्यानंतर सर्वप्रथम वणीचे तालुका वैद्यकीय अधिकारी मंदार मराठे यांनी वाघिणीची तपासणी केली. त्यानंतर वाघिणीला पिंजऱ्यात टाकून गोरेवाडा येथे रवानगी केली.