रेती तस्करीतील मास्टर माइंड रंगेहाथ अडकला, ‘एलसीबी’ने चौसाळा मार्गावर केली कारवाई
By सुरेंद्र राऊत | Published: November 7, 2023 06:06 PM2023-11-07T18:06:00+5:302023-11-07T18:06:36+5:30
दहशतीसाठी देशी कट्ट्याचा वापर
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटावर दबंगगिरीतून दहशत निर्माण करणारा मास्टर माइंड स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. दोन दिवसांपूर्वी त्याचा निकटवर्तीय देशी कट्टा बाळगताना पोलिसांना मिळाला. बेंबळा व वर्धा नदीतील रेती घाटांवर गेल्या दहा वर्षांपासून बबलू ठेकेदार याची दहशत आहे. तो शासकीय यंत्रणेला पैसे पुरविण्याचे काम करतो. यामुळेच आपले वाहन कुणी पकडणार नाही, अशा तोऱ्यात असतो. सोमवारी रात्री एलसीबी पथकाने त्याला रेती भरलेल्या ट्रकसह चौसाळा रोड वाघापूर येथे ताब्यात घेतले.
शेख अशफाक शेख छोटू उर्फ बबलू ठेकेदार (४२, रा. इंदिरानगर बाभूळगाव), शेख राहील शेख युनूस (२२, रा. धोंगडेबाबा ले-आऊट), ट्रकचालक शेख जमील शेख गफ्फूर (३८, रा. इंदिरानगर बाभूळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदीतील नांदेसावंगी घाटातून रेतीची चोरी करून ती (एमएच २९ बीई ७०७५) क्रमांकाच्या ट्रकमधून घेऊन जात होते. ही चोरीची रेती नेत असतानाच ‘एलसीबी’चे पथक तेथे पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, जमादार विनोद राठोड यांनी कारवाई करीत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच ट्रक लोहारा पोलिस ठाण्यात लावला. याप्रकरणी लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची माहिती महसूल विभागालाही देण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच राहील आला जामिनावर
परिसरात दहशत पसरवून शस्त्राचा धाक दाखवत रेतीचा उपसा केला जातो. त्यासाठीच सतत अग्निशस्त्र जवळ बाळगले जाते. शेख राहील शेख युनूस याला देशी कट्ट्यासह एलसीबीने अटक केली. कारागृहातून जामीन मिळताच तो बाहेर आला आणि दुसऱ्या दिवशी रेती तस्करीचा ट्रक घेऊन आपल्या मास्टर माइंड बबलू याच्यासह यवतमाळात आला.
बबलूच्या दहशतीचे अनेक कारनामे
बबलू ठेकेदाराचा रेती तस्करीतील प्रवास थक्क करणारा आहे. रोज मजुरी ते आता कोट्यवधीच्या मालमत्तेचा धनी बनला आहे. त्याच्यावर बाभूळगाव पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तर अनेक गुन्हे रेकॉर्डवरही आलेले नाही. परिसरात दहशत निर्माण केली असून, सर्व सामान्य शेतकऱ्यांना रेती घाटावर जाण्यासाठी तो धमकावत असतो. बळजबरीने शेतकऱ्यांच्या शेतातून रेतीची वाहने टाकतो. कुणी मज्जाव केला तर जीवघेणी मारहाण केलेली आहे. ही प्रकरणे दहशतीपोटी रेकॉर्डवर आलेली नाहीत.